एचव्हीएसी सल्लागार जी. जे. जिवाणी यांना आयएसएचआरएई जीवनगौरव पुरस्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:04+5:302021-04-17T04:07:04+5:30
नागपूर : इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अॅण्ड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्सचा (आयएसएचआरएई) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार नागपूरचे नामांकित हिटिंग, ...

एचव्हीएसी सल्लागार जी. जे. जिवाणी यांना आयएसएचआरएई जीवनगौरव पुरस्कार ()
नागपूर : इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अॅण्ड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्सचा (आयएसएचआरएई) प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार नागपूरचे नामांकित हिटिंग, व्हेंटिलेशन व एअर कंडिशनिंग (एचव्हीएसी) सल्लागार जी.जे. जिवाणी यांना नॅशनल कमेटी कडून देण्यात आला आहे.
यापूर्वी जिवाणी यांना २०१२-१३ मध्ये याच संस्थेच्या अध्यक्षीय एमिरेटस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून आता जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. जिवाणी यांनी आयआयटी-दिल्ली येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली असून ते इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स फेलो आहेत. ते चार्टर्ड इंजिनिअर आहेत. जिवाणी यांनी टाटा कन्स्लटिंग इंजिनिअर्स, दलाल कन्स्टलटंटसोबत त्यांच्या इराक आणि सौदी अरेबिया येथील अल यामामा येथील प्रकल्पासाठी प्रमुख म्हणून काम केले आहे.
वर्ष १९८५ मध्ये जिवाणी यांनी नागपुरात हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या क्षेत्रात महानगरांचा दबदबा होता. रहिवासी घरे, सभागृहे, मोठ्या संस्था, हॉटेल्स ते हॉस्पिटल्स, सिनेमा ते बंगलो आदींसाठी त्यांनी जागतिक दर्जाच्या वातानुकुलन व्यवस्था तयार केल्या. सोबतच जिवाणी यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. वयाच्या अवघ्या 30 वर्षी अमेरिकन एअर कंडीशन्ड सोसायटीने त्यांना आपले सभासदत्व बनवले. आयएसएचआरएईच्या नागपूर शाखेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या यांत्रिक अभियांत्रिकी अभ्यास मंडळाचे सदस्य, इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे मानद सचिव ही पदे ते भूषवित आहेत.
जिवाणी यांनी हा पुरस्कार आयएसएचआरएई संस्थेच्या नागपूर शाखेला समर्पित केला असून संस्थेची कोअर कमिटी व माजी अध्यक्षांचे आभार मानले आहेत. स्व. राजीव नासेरी, स्व. राजेंद्र पाटील, स्व. मनीष गडेकर, भूषण जागिरदार आणि मोईन नकवी या पाच सदस्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला आहे.