देशभरात साडेपाच हजारांवर खवल्या मांजरांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:37 IST2020-12-15T21:34:11+5:302020-12-15T21:37:13+5:30
Pangolin Hunting दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजर या प्राण्याच्या शिकारीचा देशभरातील आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. मागील ९ वर्षात देशात ५,७६२ खवल्या मांजरांची शिकार झाल्याची एका संस्थेच्या अहवालातील आकडेवारी आहे.

देशभरात साडेपाच हजारांवर खवल्या मांजरांची शिकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजर या प्राण्याच्या शिकारीचा देशभरातील आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. मागील ९ वर्षात देशात ५,७६२ खवल्या मांजरांची शिकार झाल्याची एका संस्थेच्या अहवालातील आकडेवारी आहे. संघटित गुन्हेगारांच्या माध्यमातून या प्राण्याची विदेशात तस्करी होत असल्याचेही पुढे आले आहे. या दुर्मिळ प्राण्याला वाचविण्यासाठी व तस्करी रोखण्यासाठी वन विभाग आता विशेष ॲक्शन प्लॅन राबविणार आहे.
राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात हा प्राणी आढळतो. त्यामुळे त्याच्या तस्करीचे आणि शिकारीचे प्रमाणही याच भागात अधिक आढळते. या प्राण्याच्या शिकारी केवळ मांस खाण्यासाठी होतात की यामागे संघटित तस्करांची टोळी आहे, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. ट्रॅफिक या संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये २००९ ते २०१७ या काळात ५,७६२ खवले मांजरांची शिकार झाल्याची नोंद आहे. नागपूर जिल्ह्यात १९ मे रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या पथकाने शिजवायला घातलेल्या मांसासह दोन आरोपींनी अटक केली होती.
तस्करी होते विदेशात
खवले मांजराची तस्करी विदेशात होते. त्याच्या पाठीवरील खवल्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या पावडरचा वापर औषधासाठी केला जातो. चीनमध्ये त्याचा सर्वाधिक वापर होतो. या सोबतच मलेशिया, व्हिएतनाममध्येही या प्राण्याची तस्करी होते. एक लाख रुपयात एक प्राणी विकला जातो. प्रौढ खवले मांजराचे वजन एक किलो असते.
तांत्रिक गटाची स्थापना
खवले मांजरच्या संरक्षण व संवर्धनासाठी वन विभागाकडून कृती आराखडा आखला जाणार आहे. वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन व वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञांना समाविष्ट करून तांत्रिक गटाची स्थापना करण्यात आली आहे. पुणे येथील वन्यजीव वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. यात डॉ. बी.एस. हाडा (उपवनसंरक्षक सातारा), दीपक खाडे (उपवनसंरक्षक रत्नागिरी), विश्वास काटदरे (सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण), डॉ. वरद गिरी (संचालक एनआयडीयुएस), नितीन देसाई (संचालक, सेंट्रल इंडिया वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया), रोहन भाटे (माजी वन्यजीव रक्षक, सातारा) यांचा समावेश आहे.
खवले मांजरच्या वाढत्या शिकारीमागे संघटित गुन्हेगारी आहे का, याचा शोध वनविभागाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आराखडा तयार होताच तातडीने उपाययोजना राज्यात केल्या जातील.
नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)