शंभरी आता ‘एक’ नंबरी !
By Admin | Updated: November 9, 2016 02:56 IST2016-11-09T02:56:10+5:302016-11-09T02:56:10+5:30
केंद्र शासनाने काळ्या बाजाराला लगाम लावण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे नागपूरकरांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या

शंभरी आता ‘एक’ नंबरी !
नागपूरकरांच्या ‘एटीएम’वर उड्या १०० च्या नोटांसाठी धावाधाव पेट्रोल पंपावर रांगा
नागपूर : केंद्र शासनाने काळ्या बाजाराला लगाम लावण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे नागपूरकरांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या. देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे व्यापार व उद्योग वर्तुळातून स्वागत करण्यात आले आहे तर दैनंदिन व्यवहारासाठी १०० रुपयांच्या नोटा कशा आणायच्या याबाबत सामान्य जनतेत चिंता दिसून आली. एकूणच केंद्र शासनाने काळ्या बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी वित्तीय ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्याची सर्वसाधारण भावना दिसून आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय जाहीर करताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अनेक जणांनी १०० रुपयांच्या नोटा काढण्यासाठी तत्काळ ‘एटीएम’कडे धाव घेतली.
त्यामुळे नागपुरातील बहुतांश ‘एटीएम’वर रात्री नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. काही पेट्रोल पंप तसेच अनेक दुकानांमध्ये तत्काळ ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणेच बंद झाले. त्यामुळे आता व्यवहार होणार कसे याबाबत सामान्य जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
देशाच्या विकासाला चालना मिळेल
या निर्णयामुळे प्रामाणिक नागरिकांना कोणताही धक्का लागणार नाही. केवळ काळा पैसा संपविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात महागाई कमी होईल. मालमत्तेचे योग्य दर निश्चित होतील. केंद्र व राज्य शासनाला कर स्वरूपात भरपूर पैसा उपलब्ध होईल. परिणामी देशाच्या विकासाला चालना मिळेल. दीर्घ लाभाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगला निर्णय आहे.
-डॉ. अनुप सगदेव (सीए), संचालक, नागपूर नागरिक सहकारी बँक
ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नव्या धोरणामुळे काळा पैसा साठविलेल्यांना झटका बसला आहे.रात्रीपासूनच ५०० ते १००० रुपयांच्या नोटा रद्दबातल केल्यामुळे बुधवारपासून व्यापार कसा करायचा हा प्रश्न आहे. ग्राहकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण आहे. शिवाय ज्या व्यापाऱ्यांना पुढील दोन दिवस आलेल्या मालाचे देयक अदा करायचे आहे, त्यांनी नेमका व्यवहार कसा करावा याबाबतदेखील प्रश्नचिन्ह आहे.
-प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन
नागरिकांनो, चिंता करूनका !
आता व्यवहार कसे होतील व आपल्याकडे असलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे काय होणार असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये दिसून आला. ‘लोकमत’ने याबाबत अर्थ व उद्योगतज्ज्ञांशी संपर्क साधला. या निर्णयामुळे कुणाच्याही हक्काच्या पैशांवर गदा आलेली नाही. नागरिक आपल्याजवळील ५०० व १००० च्या नोटा बँकांमध्ये देऊ शकतात. जर रक्कम जास्त असेल तर योग्य पुरावे सादर करून आपल्या खात्यात तिचा भरणा होऊ शकतो. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. पुढील काही दिवस १०० रुपयांच्या नोटांची कमतरता जाणवेल. मात्र या काळात व्यापारी प्रतिष्ठाने, मॉल, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी ‘एटीएम कार्ड’ द्वारे खरेदी करता येईल. शिवाय ‘आॅनलाईन बँकिंग’, ‘एनईएफटी’, ‘आरटीजीएस’ यांचे पर्याय उपयोगात आणता येतील, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
काळ्या पैसेवाल्यांचे दणाणले धाबे
नागपूर शहरात हवाला, सट्टा तसेच डब्बा व्यापारात असणाऱ्यांचे या निर्णयामुळे धाबे दणाणले आहेत. बहुतांश जणांकडे काळा पैसा हा ५०० व १००० च्या नोटांमध्येच आहे. शिवाय या पैशाची कुठेही नोंद किंवा पुरावा नाही. त्यामुळे सट्टा, हवाला व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मध्यरात्रीपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरू
दरम्यान, ५०० व १००० रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून बंद होणार असल्यामुळे नागरिकांकडून जास्तीत जास्त खरेदी व्हावी यासाठी काही व्यापारी प्रतिष्ठाने मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. यासंदर्भात नागरिकांना ‘एसएमएस’द्वारे माहितीदेखील पोहोचविण्यात येत होती. काही नागरिकांनीदेखील खरेदीसाठी संबंधित ठिकाणी धाव घेतली.