शंभरावर दिव्यांगाना सुमितने केले पायावर उभे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 23:08 IST2018-08-24T23:02:10+5:302018-08-24T23:08:15+5:30
दिव्यांगांना वितरित करण्यात येणारे जयपूर फूट त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतात. त्यामुळे दिव्यांगांना हायटेक पाय उपलब्ध करून देण्यासाठी सुमित ताटे हा युवक मागील सात वर्षांपासून धडपडत आहे. आजपर्यंत विविध कंपन्या, राजकीय नेत्यांकडून निधी जमवून त्याने शंभरावर दिव्यांगांना आपल्या पायावर उभे केले. त्यानंतर विदर्भातील दिव्यागांना हायटेक पाय मिळवून देऊन सक्षम बनविण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी कार्पोरेट कंपन्या, राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा सुमितने व्यक्त केली आहे.

शंभरावर दिव्यांगाना सुमितने केले पायावर उभे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिव्यांगांना वितरित करण्यात येणारे जयपूर फूट त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतात. त्यामुळे दिव्यांगांना हायटेक पाय उपलब्ध करून देण्यासाठी सुमित ताटे हा युवक मागील सात वर्षांपासून धडपडत आहे. आजपर्यंत विविध कंपन्या, राजकीय नेत्यांकडून निधी जमवून त्याने शंभरावर दिव्यांगांना आपल्या पायावर उभे केले. त्यानंतर विदर्भातील दिव्यागांना हायटेक पाय मिळवून देऊन सक्षम बनविण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी कार्पोरेट कंपन्या, राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा सुमितने व्यक्त केली आहे.
एका खासगी संस्थेत काम करणाऱ्या आणि शक्तीमाता नगरातील रहिवासी सुमित ताटे या दिव्यांग युवकाला सुरुवातीपासूनच दिव्यांगांसाठी काम करण्याची जिद्द आहे.जयपूर फूटमुळे दिव्यागांना अनेक प्रकारचा त्रास होतो. जयपूर फूट काही ठराविक कालावधीनंतर खराब होतात. काम करताना त्याचा त्रास होतो, त्वचेलाही दुखापत होते. त्यामुळे दिव्यागांना ‘हाय टेक स्टील टेक्चर प्रोस्थेटिक’ म्हणजे हायटेक पाय उपलब्ध करून दिल्यास त्यांना कुठलेही काम सहज करता येईल, हा विचार सुमितच्या मनात आला. २०११ मध्ये त्याने आधार अपंग सामाजिक बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. २०१४ मध्ये त्याने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडशी संपर्क साधून त्यांचा ४ लाखाचा सामाजिक मदतनिधी मिळवून २० जणांना हायटेक पाय मिळवून दिले. त्यानंतर पुन्हा डब्लूसीएलकडून १० लाख मिळवून चंद्रपूर जिल्ह्यातील ५० जणांना हायटेक पाय दिले. २०१२ आणि २०१३ मध्ये दोन लाख रुपये मॉईलकडून घेऊन त्याने गरजू दिव्यांगांना हायटेक पाय उपलब्ध करून दिलेत. खासदार अविनाश पांडे यांच्या निधीतूनही सुमितने दोन लाख रुपये मिळवून दिव्यांगांना हायटेक पाय उपलब्ध करून देण्यासाठी धडपड केली. सुमितने हायटेक पाय मिळवून दिलेले शंभरावर दिव्यांग आज समाजात नोकरी, उद्योग करून सन्मानाने जीवन जगत आहेत. अनेकजण दुचाकी, बुलेट चालवित असून आपण दिव्यांग असल्याचा त्यांना विसर पडला आहे. यापुढे विदर्भातील दिव्यांगांसाठी हायटेक पाय उपलब्ध करून देण्याचा सुमितचा मानस आहे. सुमितला त्याचे मित्र नितीश गायकवाड, प्रकाश कापडे, आकाश कीर्तने यांचे सहकार्य लाभत आहे. आपल्या कार्यासाठी सुमितला कार्पोरेट कंपन्या, समाजातील दानदाते, राजकीय नेत्यांचे पाठबळ हवे आहे. आर्थिक पाठबळ मिळाल्यास विदर्भातील दिव्यांग बांधवांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी हायटेक पाय उपलब्ध करून देण्याचा मानस त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.