नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) नागपूर आणि चंद्रपूर पथकाने विदेशी आणि देशी दारूचा मोठा साठा जप्त केला. नागपुरात हंडरेड पाईपर्ससह ओल्ड मंकच्या बाटल्या आढळल्या. तर, चंद्रपूर रेल्वे यार्डमध्ये रॉकेट देशी दारू जप्त करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून आरपीएफच्या नार्कोटिक्स टीमकडून ठिकठिकाणी ऑपरेशन सतर्क अधिक तेज करण्यात आले आहे. नागपूरच्या पथकातील रवींद्र जोशी, आशिष कुमार आणि कविता कुपाले हे आज सकाळी नागपूर स्थानकावर गस्त करीत होते. ट्रेन नंबर १२६१६ जीटी एक्सप्रेस सकाळी १०.५२ वाजता फलाट क्रमांक २ वर आली असता त्यांनी गाडीची तपासणी सुरू केली. कोच नंबर ४ च्या ५७ नंबरच्या बर्थखाली त्यांना एक बॅग आढळली. या बॅग धारकाला ताब्यात घेऊन बॅगची तपासणी केली असता त्यात १०० पाईपर्सच्या ७५० मिलिच्या ५ बाटल्या (किंमत १२ हजार) आणि ओल्ड मंकच्या ७५० च्या १५ बाटल्या आढळल्या. त्या जप्त करून आरपीएफने मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवला. त्यानंतर आरोपी तसेच दारूच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविल्या. दुसरी कारवाई चंद्रपूरच्या रेल्वे यार्डमध्ये करण्यात आली. नागपूर रेल्वे लाईनजवळ आरपीएफच्या पथकाला एक बेेवारस बॅग आढळली. या बॅगची तपासणी केली असता त्यात रॉकेट नामक देशी दारूचे ३०० पाऊच आढळले. १०,५०० रुपये किंमतीची ही दारू जप्त करण्यात आली.
सतर्क रहा, माहिती द्यारेल्वेतून दारू तसेच अन्य अंमली पदार्थांची सर्रास तस्करी केली जाते. शंभरातून एखाद, दुसरा तस्कर आरपीएफ किंवा रेल्वे पोलीस पकडतात. बाकी सर्व बिनधास्त सुरू असते. त्यामुळे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या प्रवाशांचा संशय आल्यास किंवा रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर संशयास्पद व्यक्ती किंवा सामान आढळल्यास तातडीने रेल्वे पोलीस किंवा आरपीएफला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.