हुंडी दलालाने व्यापाऱ्यांना १० कोटीने फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:23+5:302020-12-15T04:26:23+5:30
जगदीश जोशी नागपूर : इतवारी येथील एका हुंडी दलालाने काही मोठ्या व्यापाऱ्यांना १० कोटी रुपयांनी फसवले. त्यासाठी त्याने व्यापाऱ्यांच्या ...

हुंडी दलालाने व्यापाऱ्यांना १० कोटीने फसवले
जगदीश जोशी
नागपूर : इतवारी येथील एका हुंडी दलालाने काही मोठ्या व्यापाऱ्यांना १० कोटी रुपयांनी फसवले. त्यासाठी त्याने व्यापाऱ्यांच्या नावावर खोटे दस्तऐवज तयार केले. व्याजाचे हप्ते जमा होणे बंद झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. व्यापाऱ्यांनी तकादा लावल्यानंतर हुंडी दलाल पैसे परत करण्यास असमर्थ असल्याचे सांगत आहे.
सूत्रानुसार, हुंडी दलाल प्रिंटिंग प्रेससोबतही जुळला आहे. त्याने सुमारे तीन वर्षापूर्वी हुंडी दलाली सुरू केली. इतवारी व पूर्ण नागपूरमध्ये हुंडी दलाल सक्रिय आहेत. त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना व्याजावर कर्ज दिले जाते. हुंडी दलाल व्यापारी, उद्योजक, सरकारी अधिकारी, डॉक्टर, वकील व सीए यांच्याशी जुळलेले असतात. हे व्यक्ती हुंडी दलालाच्या माध्यमातून गरजू व्यापाऱ्यांना उधारी देतात. हमीकरिता कर्जदाराकडून धनादेश घेतला जातो व त्याच्या फर्मच्या लेटरहेडवर रकमेची माहिती लिहिली जाते. हुंडी दलालाला या व्यवहारात दोन्ही पक्षांकडून १५ पैसे कमिशन मिळते. हे व्यवहार कोट्यवधी रुपयांत होतात. संबंधित हुंडी दलालाने प्रसिद्ध व्यापाऱ्यांच्या फर्मचे बनावट लेटर हेड तयार केले होते. त्या आधारावर त्याने कोट्यवधी रुपये मिळवले. त्यातून पूर्व नागपुरातील आलिशान बंगला व लक्झरी कार खरेदी केली. तसेच, व्यवसायाचा विस्तार केला.
हुंडी व्यवसायात सध्या ८० पैसे ते सव्वा रुपयापर्यंत व्याजदर आहे. हुंडी दलालाने सव्वा ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखविले. त्यामुळे अनेक मोठे व्यापारी त्याच्याशी जुळले. सुुुरुवातीला त्याने व्यापाऱ्यांना वेळेवर व्याज दिले. त्यानंतर त्याने रंग दाखवायला सुरुवात केली. दरम्यान, व्यापाऱ्यांना हुंडी दलालाने कपड्याचे दुकान सुरू केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे व्यापाऱ्यांना संशय आला. अधिक चौकशी केल्यानंतर हुंडी दलालाचे कारनामे पुढे आले.
----------------
वर्षभरातील पाचवी घटना
ही वर्षभरातील पाचवी घटना आहे. यापूर्वी कर्जदार साखर व्यापारीने हात वर केले होते. साखर कारखाना संचालकांना अग्रीम रक्कम दिल्यामुळे व्यापारी अडचणीत आला होता. त्याही आधी डब्बा प्रकरणात दोन सराफा व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपये गिळंकृत केले होते.