‘एचयूआयडी’ने ज्वेलरी उद्योगाचे नुकसान होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:16+5:302021-07-18T04:07:16+5:30
- सराफांमध्ये भीती : प्रक्रियेत उशीर, ज्वेलर्स असोसिएशनचे मंत्र्यांना पत्र नागपूर : सराफांना हॉलमार्क दागिन्यांची विक्री बंधनकारक केल्यानंतर हॉलमार्किंग ...

‘एचयूआयडी’ने ज्वेलरी उद्योगाचे नुकसान होणार
- सराफांमध्ये भीती : प्रक्रियेत उशीर, ज्वेलर्स असोसिएशनचे मंत्र्यांना पत्र
नागपूर : सराफांना हॉलमार्क दागिन्यांची विक्री बंधनकारक केल्यानंतर हॉलमार्किंग सेंटरतर्फे नियमांतर्गत दागिन्यांवर एचयूआयडी (हॉलमार्किंग युनिक आयडेन्टिफिकेशन) क्रमांकाची नोंद करण्यात येत असल्याने सराफांचे सर्वाधिक नुकसान होत असून त्यामुळे दुकाने बंद होणार असल्याची भीती सराफा व्यक्त करीत आहेत.
ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे संचालक आणि नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, १ जुलै २०२१ पासून हॉलमार्क दागिन्यांवर एचयूआयडी क्रमांकाची नोंद करण्याचे बंधन भारतीय मानक ब्यूरोच्या हॉलमार्किंग सेंटरवर टाकण्यात आले आहे. पण देशभरात हॉलमार्किंग सेंटरची कमतरता असल्याने ८०० पैकी केवळ २५६ जिल्ह्यातच हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. पुढे नवीन सेंटर सुरू झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक होणार आहे. एचयूआयडीकरिता आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सेंटर नसल्याने दागिन्यांवर एचयूआयडी क्रमांक टाकण्यास जास्त वेळ लागत आहे.
आठ दिवसांचे वेटिंग
नागपुरात दोन हॉलमार्किंग सेंटर असल्याने एचयूआयडीकरिता आठ दिवसांचे वेटिंग आहे. हीच स्थिती अन्य शहरातही आहे. यामुळे ग्राहकांना दागिन्यांची डिलिव्हरी वेळेत देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. या स्थितीसंदर्भात नागपूर सराफा असोसिएशने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून एचयूआयडीचे नियम त्वरित मागे घेण्याची विनंती केली आहे. सराफा सोन्याच्या शुद्धतेबाबत कटिबद्ध आहेत, पण एचयूआयडीमुळे व्यवसायाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे बेरोजगारी आणि समस्या वाढणार आहे.
एचयूआयडी त्रासदायक का?
एचयूआयडी हे हॉलमार्किंग दागिन्याची नोंद करणारा एक युनिक आयडेन्टिफिकेशन क्रमांक आहे. त्याद्वारे दागिन्याचे वजन, कॅरेट आणि कुठे तयार झाला, याची माहिती मिळते. हा क्रमांक हॉलमार्क सेंटरतर्फे बीआयएस पोर्टलवर अपलोड करण्यात येतो. त्यानंतर दागिन्यात कुठलीही सुधारणा करता येत नाही. जर १५ ग्रॅमच्या मंगळसूत्रात नवीन पेंडेंट टाकायचे असेल वा गोफ लहान करायचा असेल तर ते शक्य नाही. त्यामुळे सराफा व्यवसाय ठप्प होणार असल्याची भीती रोकडे यांनी व्यक्त केली.