लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरी लावून देण्याच्या नावाखाली कोट्यवधींच्या फसवणुकीच्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. अमरावती पोलिस आयुक्तालय कार्यालयात कर्मचारी असल्याची बतावणी करून आरोपीने त्याची पत्नी व एका साथीदारासह हे रॅकेट रचले. बेरोजगारांना पोलिस, मेट्रो किंवा सैन्यदलात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली त्यांनी अनेकांना गंडा घातला. बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील अशोक माटे (२६, दुधाळा, मौदा) असे तक्रारदाराचे नाव आहे, तर प्रदीप चव्हाण ऊर्फ जगदीश राठोड ऊर्फ प्रकाश धनराज राठोड (घुई, लासिना, नेर, यवतमाळ), त्याची बायको शालू जगदीश राठोड व पूजा निखिल चव्हाण (पोहना, हिंगणघाट), अशी आरोपींची नावे आहेत. स्वप्नील बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. जून २०२४ मध्ये एका मैत्रिणीच्या माध्यमातून स्वप्नीलला आरोपी प्रदीप चव्हाण हा पोलिस विभागात नोकरी लावून देतो, असे कळाले. स्वप्नील पोलिस भरतीची तयारी करतच होता. जून २०२४ मध्ये प्रदीप व पूजा स्वप्नीलला भेटायला आले व १० लाख रुपयांत नोकरी लावून देतो, असे म्हटले. त्याने पोलिस असल्याचे स्वतःचे खोटे ओळखपत्र दाखविले. नंतर त्याने स्वप्नीलच्या आई-वडिलांची भेट घेऊन दोन्ही मुलांना अमरावती पोलिस दलात नोकरी लावून देतो, असे पैसे नसल्याचे सांगितले. सांगितल्यावर त्याने त्यांना गृहकर्ज काढून देतो व ते पैसे मला द्या, असे म्हटले. प्रदीपने एका व्यक्तीच्या माध्यमातून स्वप्नीलला ७:२० लाखांचे कर्ज काढून दिले. मात्र, आणखी पैसे लागतील, असे सांगितले. त्याने काही अॅपवरून कर्ज काढायला सांगितले. त्याच्या सांगण्यावरून स्वप्नीलने टप्प्याटप्प्यात त्याच्या खात्यात ९.३२ लाख तसेच त्याच्या पत्नीच्या खात्यात ७.०५ लाख रुपये असे १६.८६ लाख रुपये पाठविले. आरोपींनी काही कालावधीने स्वप्नीलला अमरावती पोलिस आयुक्तालयात नोकरीचे बनावट नियुक्तिपत्रदेखील दिले. तिथे गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे स्वप्नीलच्या लक्षात आले. त्याच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश राठोड याला पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अमरावती शहरातून ताब्यात घेत अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, राम कांढुरे, नंदकिशोर तायडे, रविंद्र आकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
विविध जिल्ह्यांत जाऊन शोधायचा 'टार्गेट'जगदीश हा कोणत्याही एका शहरात जास्त दिवस राहत नसे. तो वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन वास्तव्य करायचा व फसवणूक झाली की दुसऱ्या ठिकाणी रवाना व्हायचा. त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो काही गुन्ह्यांत फरारदेखील होता.
पैशांसोबतच गिफ्टचीदेखील मागणीआरोपींनी स्वप्नीलकडून पैसे तर उकळलेच. शिवाय त्यांनी त्याच्याकडून दोन महागडे मोबाइल फोनदेखील घेतले. आरोपींनी अशाच पद्धतीने वसंत धनराज कडू, आकाश भीमराव भोरे यांना नागपूर मेट्रोमध्ये डेटा ऑपरेटर पदावर, विकास सुधाकर कडू, पंज राजेंद्र कडू व पंकज नाईक यांना नागपूर मेट्रोत सिक्युरिटी सुपरवायझर, गौरव भवते व रोहित ढोके यांना भारतीय सैन्यदलात, सौरभ अशोक माटेला वनविभागात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली गंडा घातला.