सातनवरीनजीकच्या इंडस पेपर मिलला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST2021-05-05T04:11:41+5:302021-05-05T04:11:41+5:30

कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील सातनवरीनजीकच्या इंडस पेपर मिलला सोमवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत टिशू ...

A huge fire broke out at Indus Paper Mill near Satnavari | सातनवरीनजीकच्या इंडस पेपर मिलला भीषण आग

सातनवरीनजीकच्या इंडस पेपर मिलला भीषण आग

कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील सातनवरीनजीकच्या इंडस पेपर मिलला सोमवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत टिशू पेपर उत्पादनाकरिता विदेशातून आयातीत वेस्टेज कागद व तयार मालाच्या रिळ असा २० कोटी रुपयांचा माल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी सतत पाण्याचा मारा करूनही ही आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आलेली नव्हती.

कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सातनवरीनजीक ओरोगामी ग्रुपच्या मालकीची इंडस पेपर मिल आहे. इंडस पेपर मिलमध्ये टिशू पेपर, किचन टॉवेल व टायलेट रोलचे उत्पादन केले जाते. या मिलमध्ये दिवसाला ५० टन टिशू पेपर, किचन टावेल व टायलेट रोल आदी मालाचे उत्पादन होते. या पेपर मिलमध्ये उत्पादित बहुतांश माल विदेशात निर्यात होतो. टिशू पेपरच्या उत्पादनाकरिता विदेशातून येथे कच्चा माल म्हणून कागद आयात करण्यात येतो.

सोमवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास कंपनीच्या आवारातील कागदाच्या ढिगाऱ्याने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे दिसताच कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, आगीने रोद्ररूप धारण केल्याने तिथे कार्यरत १६० महिला पुरुष कामगारांना सुरक्षा कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सोलार कंपनीच्या अग्निशमन पथकासह वाडी, हिंगणा, कळमेश्वर आणि नागपूर महापालिकेचे अग्निशमन पथक येथे दाखल केले. पाच बंबाच्या माध्यमातून ही आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. पेपर मिलला आग लागताच सर्वप्रथम शिरपूर गट ग्रामपंचायतीचे सरपंच गौरीशंकर गजभिये यांनी गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीचे रौद्ररूप लक्षात घेत कळमेश्वर पोलीस ठाण्याचे एएसआय मोरेश्वर नागपुरे यांच्यासह पोलीस नायक माणिक शेरे, गजेंद्र निंबेकर, नीलेश डंभारे, दाऊद मोहम्मद यांनी बघ्यांची गर्दी कमी केली.

--

कंपनीत जवळपास ४ हजार टन आयातीत कच्चा माल व कागदाच्या तयार रिळ होत्या. या आगीत जवळपास २० कोटी रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माल ठेवण्यात आलेले चारही शेड जळाले आहे. आग विझल्यानंतरच एकूण नुकसानीची माहिती कळेल.

- शरद शिंदे, व्यवस्थापक, इंडस पेपर मिल, सातनवरी

Web Title: A huge fire broke out at Indus Paper Mill near Satnavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.