विद्यापीठांतून कसे घडणार कलेक्टर, कमिश्नर अन् अधिकारी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:14+5:302021-07-28T04:08:14+5:30
योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची देशातील जुन्या विद्यापीठांत गणना होत असली तरी ...

विद्यापीठांतून कसे घडणार कलेक्टर, कमिश्नर अन् अधिकारी ?
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची देशातील जुन्या विद्यापीठांत गणना होत असली तरी प्रत्यक्षात येथील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांत माघारता दिसून येतात. विद्यापीठात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र मागील पाच वर्षांत विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रासह विविध विभागांतर्फे आयोजित उपक्रमांत चार हजार विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शन मिळालेले नाही. ही आकडेवारी पाहता विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी विद्यापीठाने विशेष पुढाकार घेण्याची गरज आहे.
नागपूर विद्यापीठातर्फे स्पर्धा परीक्षा केंद्र चालविण्यात येते. याशिवाय करिअर व समुपदेशन सेलदेखील आहे. मात्र या केंद्राच्या कामगिरीचा ‘ग्राफ’ खालावलेलाच आहे. २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत विद्यापीठात लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले व सुमारे साडेतीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली. कॅम्पसमधीलच विद्यार्थ्यांची संख्या १५ हजार ५५९ इतकी होती व यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा आकडा ५ हजार ९३६ इतका होता; परंतु एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता विद्यापीठाच्या या सेलने हवा तसा पुढाकार घेतला नाही. पाच वर्षांत स्पर्धा परीक्षा व करिअर समुपदेशानासाठी आयोजित उपक्रमांचा लाभ केवळ ३ हजार ९५० विद्यार्थ्यांनी घेतला. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. विद्यापीठात अनेक हुशार विद्यार्थी असतात व त्यांना स्पर्धा परीक्षा देण्याचा मानस असतो. मात्र महाविद्यालय व विभागात शिकताना त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळत नसल्याचे चित्र बदलण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी केवळ सातच सत्र
२०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, करिअर समुपदेशन इत्यादी मुद्द्यांवर एकूण ४१ सत्रांचे आयोजन करण्यात आले. यात विविध क्षेत्रामधील करिअर संधी यांच्यावरच जास्त भर होता. स्पर्धा परीक्षांशी संबंधित केवळ सातच मार्गदर्शन सत्र आयोजित झाले. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी प्रोत्साहन कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सत्रांमधून मार्गदर्शन मिळालेले विद्यार्थी
वर्ष : विद्यार्थी
२०१५-१६ : १,०२८
२०१६-१७ : २,३९२
२०१७-१८ : १००
२०१८-१९ : ३७७
२०१९-२० : ५३