लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : घराच्या अंगणात असलेल्या विहिरीचे पाणी दोन दिवसांपासून गरम येत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पाणी स्वच्छ असून, त्याचा कुठलाही गंध येत नाही. या पाण्याचे प्रयोगशाळेत नमुने तपासले नसल्याने ते गरम का होत आहे, याचे वैज्ञानिक कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
नीलकंठ फुके, रा. पॉवर हाउस परिसर, काटोल यांच्या मालकीची ही विहीर असून, ती किमान ३० फूट खोल आहे. या विहिरीचे खोदकाम फार पूर्वी करण्यात आले असून, विहिरीतील पाण्याचा नियमित वावर केला जात असल्याने पाण्याचा उपसाही होत आहे. तेव्हापासून तर दोन दिवसांपूर्वीपर्यंत या विहिरीचे पाणी थंड होते. घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. त्यातच दोन दिवसांपासून या विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे पहिल्यांदा कामावरील कामगारांच्या निदर्शनास आले. शेजारच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केली माहिती नीलकंठ फुके यांनी दिली.
या पाण्यातून वाफ निघत नसली तरी ते विहिरीतून काढून लगेच अंघोळीसाठी वापरण्याजोगे कोमट आहे. त्या पाण्याला कुठलाही गंध नाही किंवा त्यात काही मिसळले नसल्याचेही प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. त्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडत आहे, हे कळायला मार्ग नाही. नीलकंठ फुके यांनी या प्रकाराची माहिती स्थानिक नगरपालिका प्रशासनाला दिली आहे. काहींच्या मते हा भूगर्भातील काही हालचालींचा परिणाम आहे तर काहींनी गरम झरे किंवा जिओथर्मल अॅक्टिव्हिटीची शक्यता व्यक्त केली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी विहीर व पाण्याची तपासणी केली. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले नाही.
पाण्याची तपासणी करणे आवश्यकया पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी न केल्याने त्यात नेमके कोणते घटक किती प्रमाणात मिसळले आहेत, ते घटक मानवी आरोग्यास हानिकारक आहे की नाही, हे कळायला मार्ग नाही. या पाण्यात जमिनीतील लोह किंवा सल्फरयुक्त खनिजे, कार्बोनेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोराइड, सल्फेट, सिलिका यासारखे घटक कमी अधिक प्रमाणात मिसळल्याने पाणी गरम झाल्याची शक्यता आहे. या पाण्याचा पीएच तपासणेदेखील गरजेचे आहे.