शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मॉयलने ३१३ एकर जमीन अधिग्रहीत कशी केली? - चंद्रशेखर बावनकुळे
By जितेंद्र ढवळे | Updated: October 10, 2023 17:17 IST2023-10-10T17:17:24+5:302023-10-10T17:17:50+5:30
सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली.

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मॉयलने ३१३ एकर जमीन अधिग्रहीत कशी केली? - चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : सावनेर तालुक्यातील खापा, तिघई व गुमगाव येथील शेतकऱ्यांचे आक्षेप न नोंदविता मॉयलने ३१३ एकर जमीन ५० वर्षांच्या लीजवर घेतली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने हा निर्णय एकतर्फी झाल्यामुळे मॉयल व महसूल प्रशासनाने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे सात-बारे तत्काळ दुरुस्त करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कळमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अनुदान, पीकविम्याचे अनुदान तातडीने देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावर पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
धापेवाडा येथे उड्डाणपुलाचा विस्तार करून नागरिकांना येण्या- जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याच्या मागणीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढावा. सावनेर बायपासवर स्ट्रीट लाइट लावण्यात यावे, कळमेश्वर येथे सुरू असलेल्या अवैध अतिक्रमण व हॉटेलवर कार्यवाही करावी. बसस्थानक ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करावे, भूमीअभिलेख विभागाच्या अडचणी यासह विविध समस्या सोडविण्यात याव्या, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. कळमेश्वर येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले.
महाजनको देणार महादुल्याला पाणी
कामठी तालुक्यातील महादुला नगर पंचायत क्षेत्रात मजिप्रच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून मोठ्या प्रमाणात देयके देण्यात आल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले. यावर बावनकुळे यांनी महादुला प्रकल्पबाधित गावात असून नागरी सुविधांसाठी महाजनकोच्या सीएसआरमधून १५ लाख लिटर पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी महाजनको अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसा प्रस्ताव तातडीने नगर पंचायत व मजिप्रने तयार करावा, अशा सूचना केल्या.