तो कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या कक्षात आलाच कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST2021-08-21T04:12:05+5:302021-08-21T04:12:05+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेत सुरक्षा ठेव प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटदाराने जिल्हा परिषदेत येऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. या ...

तो कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या कक्षात आलाच कसा?
नागपूर : जिल्हा परिषदेत सुरक्षा ठेव प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटदाराने जिल्हा परिषदेत येऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणात अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रकरणात खुलासा होईपर्यंत पुढचे कामकाज होणार नाही, असा जोरकस प्रयत्नही केला. दरम्यान, सभागृह २० मिनिटं मौन राहिलं पण अधिकाऱ्यांनी खुलासा काही केला नाही.
विरोधी पक्षाचे सदस्य कैलास बरबटे यांनी सुरक्षा ठेव घोटाळ्यात आरोपी असलेले कंत्राटदार जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना भेटत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सत्तापक्षातील सदस्य प्रकाश खापरेंनी तो लावून धरला. उपगट नेते व्यंकट कारेमोरे आणि आतिश उमरे यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी करीत कंत्राटदारच जिल्हा परिषद चालवत असल्याचा आरोप केला. अध्यक्षा बर्वे यांनी संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला. चौकशी पूर्ण का झाली नाही? दोषी कंत्राटदार आलाच कसा? अधिकाऱ्यांनी पोलिसांना का कळविले नाही, असाही सवाल उपस्थित करीत अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. परंतु अधिकाऱ्यांकडून काही उत्तर आले नाही. अधिकारी अनुत्तरीत असल्याने विरोधकांनी त्याचा ठपका सत्ताधाऱ्यांवर ठेवला.
सत्ताधाऱ्यांचा वचक प्रशासनावर नाही. त्यामुळे अध्यक्षांनी रुलिंग दिल्यावरही अधिकारी उत्तर देत नाही. कंत्राटदारांच्या इशाऱ्यावर काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
- कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव
या प्रकरणात आठ दिवसात चौकशी पूर्ण करून संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प.