कसे होणार प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 07:00 AM2020-09-30T07:00:00+5:302020-09-30T07:00:13+5:30

कोरोनाबाधितांशी मनपातर्फे प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्कदेखील झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

How to be effective contact tracing? | कसे होणार प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग?

कसे होणार प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग?

Next
ठळक मुद्देकाही कोरोनाबाधितांशी मनपाकडून संपर्कच नाहीअधिकाऱ्यांचे दावे हवेतच, वस्तुस्थिती वेगळीच

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्याचे चित्र असताना प्रशासनाचा गलथानपणादेखील समोर येत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत असल्याचा दावा मनपाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात तर काही कोरोनाबाधितांशी मनपातर्फे प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्कदेखील झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोनाबाधितांशी संपर्क साधला जातो व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी होते, असे मनपाच्या अधिकाºयांकडून सांगितले जाते. मात्र लोकमतसमवेत काही जणांनी संपर्क केला असता मनपाचा हा दावा पूर्णत: खरा नसल्याची बाब समोर आली. गोपालनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवस मनपाकडून कुठलाही फोन आला नाही. त्यानंतर मनपाच्या हेल्पलाईनवर संपर्क केला असता कुणीही प्रतिसाद दिला नाही. तिसऱ्या दिवशी संबंधित व्यक्तीची पत्नी पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपाचे कर्मचारी घरावर स्टिकर लावायला आले. मात्र पती पॉझिटिव्ह असल्याची कुठलीही मनपाकडे माहितीच नव्हती.

आश्चर्याची बाब म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी बाधितांच्या संपर्कात आलेल्या सात ते आठ व्यक्तींची नावे व पत्ता लिहून घेतला. मात्र संबंधितांना ना कुठला फोन केला ना त्यांना कुणी जाऊन भेटले. अशा स्थितीत त्यांची चाचणी करण्याची बाब तर दूरच राहिली. असे प्रकार केवळ एकदाच झाले आहेत असे नाही. तर काही जणांनी आमच्यासोबतदेखील असेच झाले असल्याचे लोकमतला सांगितले.

संपर्कात आलेल्यांना १० ते १२ दिवसांनी जाताहेत फोन
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग व टेस्टिंग होणे आवश्यक आहे. ज्या बाधितांशी संपर्क साधण्यात येत आहे त्यांच्याकडून संपर्कात आलेल्यांची नावे व माहिती घेतली जाते. मात्र अनेकांना त्यानंतर १० ते १२ दिवसांनी संपर्क साधला जात आहे. इतक्या मोठ्या कालावधीत संबंधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येते. जर ती व्यक्ती बाधित असेल तर मग कोरोनाचा आणखी फैलाव होण्याचा धोका असतो.

अचानक का बदलली परिस्थिती
सुरुवातीच्या काळात अधिकारी व कर्मचारी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गंभीरतेने करत होते. मात्र आता या प्रक्रियेत काहीशी शिथिलता आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे तसे अनुभवदेखील शहरात काही लोकांना आले आहेत. अचानक ही स्थिती का बदलली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

Web Title: How to be effective contact tracing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.