शिक्षक नेमणार तरी कसे ?
By Admin | Updated: June 6, 2014 00:58 IST2014-06-06T00:58:43+5:302014-06-06T00:58:43+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २0१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५0 टक्के पूर्णकालीन शिक्षक आवश्यक असण्याची अट ठेवली आहे. परंतु विद्यापीठाच्या

शिक्षक नेमणार तरी कसे ?
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २0१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५0 टक्के पूर्णकालीन शिक्षक आवश्यक असण्याची अट ठेवली आहे. परंतु विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून सुरुवात होत आहे. अशा स्थितीत केवळ १५ दिवसानंतर वर्ग सुरू होणार कसे व ५ ऑगस्टपर्यंंंंत शिक्षकांची नियुक्ती होणार कशी, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महाविद्यालयांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे पालन करण्याच्या घाईगडबडीत फारशा कुशल नसलेल्या उमेदवारांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठाने शुक्रवारी प्रवेशासंदर्भात अधिसूचना काढली. ही अट २0१४-१५ व पुढील सत्रातील प्रथम वर्षाच्या व सत्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लागू राहील.पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट लागू असेल. विद्यापीठातर्फे मान्यता देण्यात आलेल्या शिक्षकांचा ५0 टक्क्यांत समावेश असावा, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक महाविद्यालयांनी अद्यापही शिक्षक नियुक्त केलेले नाहीत.
आता शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला तरीही रिक्त पदांची जाहिरात, त्या जाहिरातीला विद्यापीठाची परवानगी, रोस्टरला मंजुरी, निवड समित्यांची नियुक्ती आणि प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवडलेल्या शिक्षकाला मान्यता प्रदान करण्याच्या कारवाईला किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होईल तर परिपत्रकात केवळ ५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु नियमित शिक्षक न नेमताच महाविद्यालयांचे वर्ग सुरू होणार का व अशा परिस्थितीत शैक्षणिक गुणवत्तेशी खेळ होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
चार वर्षांंंंचा कालावधी का?
विद्यापीठाने जाहीर केलेल्या परिपत्रकात स्थापना होऊन ४ वर्षे पूर्ण झालेल्या महाविद्यालयांना नवीन अटी लागू नसतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा महाविद्यालयांमध्ये प्राचार्य किंवा १ नियमित पूर्णकालीन शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.
सुरुवातीला ‘वर्कलोड’ जरी कमी असले तरी महाविद्यालयांनी काही प्रमाणात तरी नियमित शिक्षक नियुक्त करणे अपेक्षित असते. परंतु विद्यापीठाने दिलेल्या या विशेष सुविधेमुळे यंदाच्या वर्षी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्याला अंतिम वर्षापर्यंंंंत नियमित शिक्षकविना अभ्यास करावा लागू शकतो. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. देशपांडे व बीसीयूडी संचालक डॉ. कोमावार यांना विचारणा केली असता त्यांनी कुठलेही ठोस उत्तर दिले नाही.(प्रतिनिधी)