कोरोना संसर्गाचे केंद्र ठरू शकतात हॉटेल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:25+5:302020-12-15T04:26:25+5:30

-रिअ‍ॅलिटी चेक सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसारच ...

Hotels can be the center of corona infection | कोरोना संसर्गाचे केंद्र ठरू शकतात हॉटेल्स

कोरोना संसर्गाचे केंद्र ठरू शकतात हॉटेल्स

-रिअ‍ॅलिटी चेक

सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी आहे. परंतु सुरुवातीला नियम पाळणाऱ्या या व्यावसायिकांना आता नियमांचा विसर पडला आहे. दोन टेबलमधील अंतर कमी झाले आहे. यातच ग्राहकांच्या होत असलेल्या गर्दीमुळे हॉटेल कोरोना संसर्गाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ चमूने शहरातील काही हॉटेल्सची ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केली असता हे धक्कादायक वास्तव सामोर आले.

शहरात आतापर्यंत कोरोनाचे ९२,७८१ रुग्ण आढळून आले आहेत. २,५९० रुग्णांचा जीव गेला आहे. सर्वाधिक बाधितांची नोंद ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झाली. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्येत घट होऊ लागली. परंतु डिसेंबर महिन्यात पुन्हा वाढ झाली. सध्या रोज ३५० ते ५०० दरम्यान रुग्णांची भर पडत आहे. यातच वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाल्याने संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. हॉटेलमध्ये मास्कचा वापर होत नसल्याने व आता फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन होत नसल्याने मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

-जगदीश सावजीमध्ये दोन टेबलमधील अंतर एक फूटही नाही

नियमानुसार, दोन टेबलमधील अंतर कमीत कमी २ ते ३ फुटांचे असणे आवश्यक आहे. परंतु सक्करदरा तलावाजवळील जगदीश सावजी हॉटेल्समध्ये दोन टेबलमधील अंतर एक फुटाचेही नसल्याचे आढळून आले. धक्कादायक म्हणजे, येथे एकाच टेबलवर सहा ग्राहक बसतात.

-शांतिभवन हॉटेल्समध्ये मास्कचा वापर नाही

पंचशील चौकातील शांतिभवन हॉटेल्समधील कर्मचारी मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, पार्सल देणारा कर्मचारी मास्क, हॅण्ड ग्लोव्हजचा वापर न करता ग्राहकाला खाद्यपदार्थ देत होता.

-‘चटोरी स्ट्रीट’वरील गर्दीकडेही दुर्लक्ष

सेंट्रल बाजार रोडवरील ‘चटोरी स्ट्रीट’वर सायंकाळ होताच ग्राहकांची मोठी गर्दी उसळते. परंतु येथेही कोरोनाचा प्रतिबंधक नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. रस्त्याच्या फुटपाथवरच टेबल्स-खुर्च्या लागतात. परंतु प्रशासनाचे अद्यापही याकडे लक्ष गेलेले नाही.

- पाणीपुरी विक्रेत्यांकडे नावालाच मास्क

चौकाचौकातीलच नाही तर गुजरात पॉईंटसारख्या मोठ्या हॉटेल्समध्येही नावालाच मास्क घालून खाद्यपदार्थ दिले जात असल्याचे आढळून आले. या हॉटेलमधील एक कर्मचारी विना मास्क पाणीपुरी ग्राहकांना देत होता. एका ग्राहकाने हटकल्यावर त्याने तोंडाऐवजी गळ्यावर मास्क लावले.

-हॉटेल्ससंदर्भातील काही नियम

:: ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एकावेळेस हॉटेलमध्ये येण्यास परवानगी नाही

:: दोन टेबलमध्ये कमीत कमी २ ते ३ फुटांचे अंतर आवश्यक

:: टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे

:: हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविड टेस्ट करणे बंधनकारक

Web Title: Hotels can be the center of corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.