विलगीकरणासाठी उपराजधानीतील हॉटेल्स मालक सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 13:51 IST2020-04-11T13:50:34+5:302020-04-11T13:51:56+5:30
विलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागपूर रेसिडेन्टल हॉटेल असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

विलगीकरणासाठी उपराजधानीतील हॉटेल्स मालक सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना १४ दिवस विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येते. विलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागपूर रेसिडेन्टल हॉटेल असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शहरातील प्रमुख १८ हॉटेलमधील ४०९ कक्षांमध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज शुक्रवारी दिली. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी येथील आमदार निवास, रविभवन तसेच वनामती येथे क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात येत आहे. यासोबतच नागरिकांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन तसेच शहरातील विविध हॉटेल्समध्ये सवलतीच्या दराने विलगीकरण करण्यासाठी आवश्यक निवास व भोजन व्यवस्था करण्याबाबत नागपूर रेसिडेन्टल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजंदर सिंग रेणू यांनी मान्य केले असून यासंदर्भातील संमतीपत्र विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना शुक्रवारी दिले.
लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी शहरातील १८ हॉटेल्स विलगीकरणासाठी उपलब्ध होणार असून यामध्ये कमीतकमी मनुष्यबळाच्या साहाय्याने किचनसह सर्व व्यवस्था राहणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देताना हॉटेल्स तीन प्रकारच्या श्रेणीत विभागण्यात आले आहेत. ‘अ’ दर्जाच्या श्रेणीमध्ये ‘थ्री स्टार’ दर्जाच्या वातानुकूलित हॉटेलचा समावेश असून निवास, भोजन व करासह २४ तासांसाठी १ हजार ५०० रुपये भाडे आकारण्यात येईल. ‘ब’ श्रेणीच्या हॉटेलमध्ये वातानुकूलित रूम राहणे, भोजन व करांसह २४ तासांसाठी ९९९ रुपये तर ‘क ’ श्रेणीच्या हॉटेलमध्ये चांगल्या दर्जाच्या राहण्याच्या सुविधा व भोजन तसेच करांसह २४ तासासाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. हॉटेलचे भाडे दैनंदिन येणाºया किमान खर्चासाठी आहे.