हॉटेल मालकाकडे आढळले शासकीय कार्यालयांचे बोगस स्टॅंप
By योगेश पांडे | Updated: April 6, 2025 22:47 IST2025-04-06T22:47:11+5:302025-04-06T22:47:43+5:30
शासकीय कार्यालयांचे बोगस रबरस्टॅंप आढळून आले.

हॉटेल मालकाकडे आढळले शासकीय कार्यालयांचे बोगस स्टॅंप
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एका हॉटेल मालकाकडे आढळले शासकीय कार्यालयांचे बोगस स्टॅंप आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. यात सब रजिस्ट्रार, ट्रेझरी कार्यालय, एनआयटी इत्यादी कार्यालयांच्या स्टॅंप्सचा समावेश आहे.
अक्षय अश्विन लिम्बना (३९, माऊंट रोड, सदर) असे आरोपीचे नाव आहे. तो माऊंट रोडवरील नवरत्न राघव या हॉटेलचा मालक आहे. एका खबऱ्याने पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांना फोन करून नवरत्न राघव या हॉटेलच्या स्वयंपाकघरात अनेक बोगस स्टॅंप असल्याची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे धाड टाकली. तेथे पोलिसांनी पाहणी केली असता शासकीय कार्यालयांचे बोगस रबरस्टॅंप आढळून आले.
या स्टॅंपचा उपयोग करून फसवणुकीचा प्रकार सुरू होता. यात सब रजिस्ट्रार (नागपूर ग्रामीण), सह दुय्यम निबंधक, ट्रेझररी ऑफिसर नागपूर, एनआयटी इत्यादींच्या २० हून अधिक स्टॅंपचा समावेश होता. ते स्टॅंप हॉटेलच्या स्वयंपाकघरात कसे आले याची विचारणा केली असता आरोपी अक्षय उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने या स्टॅंपचा उपयोग करून काय गैरप्रकार केले आहेत, याची चौकशी सुरू आहे.