नंदनवनमध्ये भीषण हत्या
By Admin | Updated: May 31, 2016 02:39 IST2016-05-31T02:39:50+5:302016-05-31T02:39:50+5:30
जुन्या वादातून नंदनवनमधील एका तरुणाची दोघांनी भीषण हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप

नंदनवनमध्ये भीषण हत्या
नागपूर : जुन्या वादातून नंदनवनमधील एका तरुणाची दोघांनी भीषण हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय अहवालाने आरोपीचे पाप उघड झाले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास हा थरार घडला. चंद्रशेखर मधुकर मालोदे (वय २७) असे मृताचे नाव आहे. तो विजयालक्ष्मी पंडितनगरात राहत होता.
चंद्रशेखरचा भाऊ राजेंद्र मधुकर मालोदे (वय ३५) हे कंत्राटदार असून, आरोपी नीतेश भरतलाल शाहू (वय २५) तसेच अजय भरतलाल शाहू (वय २७) हे सहकारनगरात राहतात. ते पेंटिंगचे काम करतात. या दोघांचा मालोदे बंधूशी वाद होता. त्याची पोलीस ठाण्यात तक्रारही झाली होती. ९ मे रोजी त्याची कोर्टाची तारीख होती. आरोपी शाहू तारखेवर हजर झाले नाही. त्यामुळे पोलिसांकडून पकड वॉरंट निघणार, अशी माहिती मिळाली होती. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही माहिती सांगण्यासाठी चंद्रशेखर आणि त्याचा मित्र चेतन सुपारे आरोपीच्या घरी गेले. तू कोर्टात का गेला नाही, तुझा आता पकड वॉरंट निघणार आहे, असे म्हणताच आरोपी नीतेश याने चंद्रशेखरला शिवीगाळ करून कानशिलात लगावली. तू माझ्या घरी आलाच कसा, अशी विचारणा करून आरोपीने त्याला जमिनीवर पाडून डोके रस्त्यावर ठेचले. मित्राच्या मदतीसाठी चेतन धावला असता आरोपी अजय शाहूने त्याला पकडून ठेवले तर, नीतेशने घरातून चाकू आणून चंद्रशेखरवर सपासप वार केले.
काही वेळेनंतर चेतन, मनोज आणि आरोपी अजयने चंद्रशेखरला आॅटोत घालून मेडिकलमध्ये नेले. तेथे चंद्रशेखरचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे आरोपी शाहू पळून गेला. (प्रतिनिधी)
घरच्यांचा आक्रोश
घटनेची माहिती चेतनने मालोदे कुटुंबीयांना दिली. त्यांनी रुग्णालयात पोहचून एकच आक्रोश केला. माहिती कळताच पोलिसही मेडिकलमध्ये पोहचले. डॉक्टरांनी त्यांना हा अपघात नसून हत्या असल्याचे सांगितले. त्यामुळे उपनिरीक्षक अंबुरे, एस. कोचोडे, मनोज घोडे, राकेश शिर्के, अतुल पित्तलवार, विश्वनाथ कुथे, आशिष आणि प्रफुल्ल वाघमारे यांनी रात्रभर धावपळ करून आरोपी नीतेश आणि अजयच्या मुसक्या बांधल्या. या घटनेमुळे रात्रीपासून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.