लोकमत न्यूज नेटवर्कखापा : इयत्ता बारावीची परीक्षा असल्याने पेपर देण्यासाठी विद्यार्थी मोटारसायकलने एकटाच परीक्षा केंद्रावर जात होता. वाटेत विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या स्कूलबसने त्याच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापा-पारशिवनी मार्गावरील खैरी (पंजाबराव) शिवारात मंगळवारी (दि. २३) सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास घडली.
सिलेंडन बुद्दलाल परतेती (२०, रा. कोदेगाव, ता. सावनेर) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो दाहोदा (ता. रामटेक) येथील जयसेवा आदिवासी कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत शिकायचा. याच शाळेत परीक्षा केंद्र असल्याने तो पेपर देण्यासाठी रोज मोटारसायकलने कोदेगावहून दाहोदा येथे जायचा. मंगळवारी अर्थशास्त्राचा पेपर असल्याने तो सकाळी मोटारसायकलने (क्र. एमएच ३६ एएफ ८६२१) कोदेगावहून पारशिवनीमार्गे दाहोदा येथे जात होता.
खापा-पारशिवनी मार्गावरील खैरी (पंजाबराव) शिवारात विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या स्कूलबसने (एमएच ४० वाय ०७८०) त्याच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने सिलेंडनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ती स्कूलबस बडेगाव (ता. सावनेर) परिसरातील आरंभ स्कूलची असून, पारशिवनी परिसरातील विद्यार्थी घेऊन शाळेच्या दिशेने येत होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व हितेश बन्सोड यांच्या मदतीने त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा नोंदवून ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात तपास सरू केला आहे.
Web Summary : A student died in Khapa near Nagpur after a school bus collided with his motorcycle while he was on his way to his 12th-grade exam. The accident occurred on the Khapa-Parshioni road, claiming the student's life instantly. Police are investigating.
Web Summary : नागपुर के खापा में एक छात्र की मौत हो गई, जब 12वीं कक्षा की परीक्षा देने जाते समय एक स्कूल बस ने उसकी मोटरसाइकिल को टक्कर मार दी। यह दुर्घटना खापा-पारशिवनी मार्ग पर हुई, जिसमें छात्र की मौके पर ही जान चली गई। पुलिस जांच कर रही है।