होळी उत्सव : नागपुरात १५० हून अधिक जणांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:41 IST2018-03-03T22:41:01+5:302018-03-03T22:41:18+5:30
अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाचा संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १५० जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून जास्त असल्याचे बोलले जाते.

होळी उत्सव : नागपुरात १५० हून अधिक जणांवर उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिउत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवड हे दोन्ही दिवस काहींसाठी नीरस ठरले. रंगाचा संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी झालेल्या एकूण १५० जणांवर मेडिकल व मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या याहून जास्त असल्याचे बोलले जाते.
गुरुवारी सायंकाळपासून ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मेयो, मेडिकल रुग्णालयात वेगवेगळ्या रंगांचे इन्फेक्शन झालेल्या १९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. मेडिकलच्या नेत्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, होळीच्या दिवशी नऊ रुग्णांच्या डोळ्यांना दुखापत झाली. यातील १६ ते १८ वयोगटातील दोन मुलांच्या डोळ्यावर रंगाचा फुगा फेकून मारल्याने त्यांच्या बुबुळाला दुखापत झाली. या दोघांवर उपचार सुरू आहेत. मेयोच्या नेत्ररोग विभागात रंगामुळे दुखापत झालेल्या रुग्णांची वेगळी नोंद ठेवण्यात आली नाही. परंतु अपघात विभागात दहावर रुग्णांनी उपचार घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मेडिकलच्या अपघात विभागात विविध अपघात, हाणामारीमुळे गंभीर जखमी झालेल्या ९८ तर मेयोमध्ये ५२ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता पाहता शासकीय रुग्णालयांमध्ये काही खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मद्यप्राशन करून गाडी चालविताना जखमी झालेल्यांमध्ये आठ जण मेडिकलमध्ये तर पाच जण मेयोमध्ये उपचारासाठी आले होते.
पाण्याचा फुगा मारल्याने डोळ्याला दुखापत
बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले, धुळवडीच्या दिवशी एका ११ वर्षीय मुलावर त्याच्या मित्राने पाण्याचा फुगा फेकून मारला. हा फुगा त्याच्या डाव्या डोळ्याला लागला. त्याच्या बुबुळाला दुखापत झाली. लागलीच उपचार केल्याने गंभीरता टळली. होळीमध्ये पाण्याचा फुगा लागून जखमी होण्याचे प्रमाण अलिकडे वाढल्याचेही ते म्हणाले.
गंभीर अपघात नाही
होळी व धुळवडीच्या दिवसात चार-पाच किरकोळ अपघातांची नोंद सोडल्यास एकही गंभीर अपघात झालेला नाही. वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त व नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.
एस. चैतन्य
पोलीस उपायुक्त (वाहतूक)