एचआयव्हीबाधित उपचारापासून वंचित!
By Admin | Updated: March 13, 2015 02:43 IST2015-03-13T02:43:16+5:302015-03-13T02:43:16+5:30
मेडिकलच्या अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर असलेल्या एचआयव्हीबाधितांच्या रक्तातील ‘लिम्फोसाईट’ ...

एचआयव्हीबाधित उपचारापासून वंचित!
नागपूर : मेडिकलच्या अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर असलेल्या एचआयव्हीबाधितांच्या रक्तातील ‘लिम्फोसाईट’ रक्तपेशींचे (सीडी फोर) प्रमाण मोजणारी मशीन गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. परिणामी उपचारासाठी आलेल्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.
एचआयव्हीबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी सरकारने मेडिकलमध्ये २००५ मध्ये ‘एआरटी‘ केंद्र सुरू केले. या केंद्रावर एचआयव्हीबाधितांची तपासणी सहा महिन्यांतून एकदा म्हणजेच वर्षातून दोनदा होते. ‘सीडी-फोर’ मशीनद्वारे रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती मोजली जाते. यामुळे ही मशीन रुग्णांसाठी फार महत्त्वाची आहे. नवीन रुग्णांचे ‘सीडी-फोर’ ३५० पेक्षा खाली गेल्यास त्याच्यावर तत्काळ औषधोपचार सुरू केला जातो. याशिवाय सुरू असलेला औषधोपचाराचा रुग्णावर पडत असलेला प्रभाव पाहण्यासाठी या मशीनचा वापर होतो. यात ‘सीडी-फोर’ प्रमाणापेक्षा कमी आढळल्यास डॉक्टरांना औषधोपचार करणे सोपे जाते. रुग्ण गंभीर होण्यापासून वाचतो. मात्र, मशीन बंद असल्यामुळे दहा हजार रुग्ण प्रभावित झाले आहेत. यात रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. प्रतीक्षेची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काहींवर अंदाजित उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मशीनच्या दुरुस्तीसाठी एआरटी केंद्राकडून संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली आहे, परंतु अद्यापही मशीन नादुरुस्तच आहे. उपचाराला उशीर होत असल्याने परिणामी रुग्ण दगावण्याचा धोका बळावत आहे . (प्रतिनिधी)