एचआयव्ही बाधितांचा जीव टांगणीला
By Admin | Updated: December 10, 2014 00:43 IST2014-12-10T00:43:14+5:302014-12-10T00:43:14+5:30
एचआयव्ही बाधितांना औषधवितरण करणाऱ्या राज्यातील ७० अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर औषधांचा तुटवडा पडला आहे. अनेक केंद्रांवर औषधांचा महिन्याभराचाही साठाही उपलब्ध नाही.

एचआयव्ही बाधितांचा जीव टांगणीला
एआरटी सेंटरवर औषधांचा तुटवडा : ४० हजार बालक औषधाविना
सुमेध वाघमारे - नागपूर
एचआयव्ही बाधितांना औषधवितरण करणाऱ्या राज्यातील ७० अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर औषधांचा तुटवडा पडला आहे. अनेक केंद्रांवर औषधांचा महिन्याभराचाही साठाही उपलब्ध नाही. यामुळे पावणेदोन लाख एचआयव्ही बाधितांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेष म्हणजे, एचआयव्ही बाधित बालकांना औषधपुरवठा करणाऱ्या कंपनीने नकार दिला आहे. परिणामी, तीन वर्षांपासून ‘लोपीनावीर’हे सिरपच उपलब्ध नसल्याने तब्बल ४० हजार बालक औषधाविना आहेत.
एचआयव्ही पूर्ण बरे करता येत नाही म्हणून प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी सरकारने एचआयव्ही बाधितांना मोफत उपचार, मार्गदर्शन व औषध वितरणासाठी राज्यभरात मेडिकल रुग्णालयांसह, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात एआरटी केंद्र सुरू केले.
या केंद्रातून मिळणाऱ्या औषधोपचारांमुळे आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येते. आयुष्यमान आणि जीवनाची गुणवत्ता वाढते. प्रतिकारशक्ती वाढते, आजाराची वाढ खुंटते आणि संसर्ग होण्याची शक्यताही कमी होते. या आजारात औषधांचा सातत्यपूर्ण मारा शरीराला शक्ती प्रदान करतो, परंतु योग्य वेळी औषध न घेतल्यास, औषधात खंड पडल्यास व्हायरसची वाढ होण्याची प्रक्रि या सुरू होते. म्हणूनच एआरटी केंद्रांवर किमान तीन महिने पुरेल एवढा औषधांचा साठा ठेवण्याचा नियम आहे.
त्यातही दर आठवड्याच्या औषधांच्या साठ्यांचा तपशील महाराष्ट्र एड्स कंट्रोल सेंटरला पाठविणे आवश्यक आहे. परंतु ‘नॅशनल एडस कंट्रोल सेंटर’मधून एआरटी केंद्रांना होणारा औषधांचा पुरवठा मागील दोन महिन्यांपासून प्रभावित झाला असून तुटवड्याचे हे मुख्य कारण मानले जात आहे.
औषधांसाठी चारवेळा चकरा
एआरटीच्या प्रत्येक केंद्रावर औषधांचा सहा महिन्याचा साठा असणे आवश्यक आहे, आणि तीन महिन्याचा साठा उरताच त्वरित औषधपुरवठा होणे गरजेचे आहे. सूत्रानुसार सर्वच एआरटी केंद्रावर केवळ महिन्याभराच्या औषधांचा साठा उरला आहे. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १५० ते २०० च्यावर रुग्ण येतात. यातील अनेक जण आपली ओळख लपविण्यासाठी जवळचे एआरटी केंद्र सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा लांबच्या केंद्रांवर जातात. येथील रुग्णांना पूर्वी एक महिन्याचे औषध दिले जात होते आता १५ ते २० दिवसांचे औषधे दिले जात आहे. यामुळे महिन्याभरात अनेकांना चारवेळा चकरा माराव्या लागत आहे. यात अनेकांना पदरमोड करून प्रवासाचा खर्च सहन करावा लागत असल्याने अनेक रुग्ण औषधांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
उपराजधानीतील दहा हजार
एचआयव्ही बाधित प्रभावित
महिन्याभरापासून एचआयव्हीवरील औषधांचा तुटवडा पडल्याने मेडिकल, मेयो व कामठीतील एआरटी केंद्रांवर उपचार घेणाऱ्या सुमारे दहा हजार एचआयव्ही बाधित प्रभावित झाले आहेत. यातील अनेक जणांना हव्या त्या प्रमाणात औषध मिळत नाही. यातच आर्थिक मागासेलपणामुळे अनेकांना येणे-जाणे परवडत नसल्याने औषध घेणे बंद करण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास तुटवड्याचे कारण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.