गिनीज रेकॉर्डसह रचला इतिहास ! राष्ट्रसंतांच्या गीताच्या सामूहिक गायनाने चार जागतिक विक्रमांची नोंद
By आनंद डेकाटे | Updated: October 11, 2025 17:50 IST2025-10-11T17:49:27+5:302025-10-11T17:50:49+5:30
राष्ट्रसंतांना नागपूर विद्यापीठाची अनोखी आदरांजली : 'या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...' या विद्यापीठ गीताच्या सामुहिक गायनाचे चार जागतिक विक्रम

History created with Guinness record! Collective singing of national anthem sets four world records
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात झालेल्या सामूहिक विद्यापीठ गीत गायनाने इतिहास रचला आहे. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...’ या विद्यापीठ गीताच्या सामूहिक गायनाच्या माध्यमातून विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह चार जागतिक विक्रमांची नोंद केली. या उपक्रमात एकूण ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १५ हजारांहून अधिक जण प्रत्यक्ष उपस्थित होते आणि १५ हजारांहून अधिक सहभागी ऑनलाईन स्वरूपात जोडले गेले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील मैदानावर विश्वविक्रमी कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण चार विश्वविक्रमाची ऐतिहासिक नोंद केली. विद्यापीठाने केलेल्या या विक्रमी उपक्रमात एकाच गाण्याचे सामूहिक गायन करीत एकाच गाण्याच्या सर्वात मोठ्या ऑनलाईन व्हिडीओ अल्बमसाठी’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. या प्रकारात आधीचा ५ हजार जण सहभागी होण्याचा विक्रम विद्यापीठाने शनिवारी मोडला. यामध्ये १५,४०२ विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. यासोबतच विद्यापीठ गीत गाण्यात एकाच वेळी सर्वात मोठा सहभाग या प्रकारात 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' देखील विद्यापीठाने केला. जास्तीत जास्त सहभागींनी विद्यापीठाचे गाणे गायले या प्रकारात विद्यापीठाने 'वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया' या विक्रमाची देखील नोंद केली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी इमा ब्रेन (इंग्लंड) यांनी यावेळी अधिकृत घोषणा करून विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे आणि आयोजन समितीला प्रमाणपत्र प्रदान केले.
याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख, सुप्रसिद्ध हास्य अभिनेता भारत गणेशपुरे, कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त उपसेन बोरकर , अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी, डॉ. समय बनसोड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षक इंग्लंड येथील इमा ब्रेन, मिलिंद वेर्लेकर, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे संजय नार्वेकर व सुषमा नार्वेकर, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. मनोज तत्ववादी प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रसंतांचा मानवता धर्माचे अनुकरण करा - नितीन गडकरी
जग संघर्षाच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला मानवतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक समर्पक ठरतो. विद्यापीठाने स्वीकारलेल्या गीतातून राष्ट्रसंतांनी मानवतेचा सुंदर भाव दिला आहे. मानवतेच्या धर्म पेक्षा कोणताही धर्म, जात, पंथ मोठा नाही. मानवता धर्माचे अनुकरण करणे हीच राष्ट्रसंतांना खरी आदरांजली ठरेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
ग्रामगीतेतून जीवनदर्शन - भारत गणेशपुरे
सुप्रसिद्ध हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांनी ग्रामगीतेतील 'बायका मुलांची चिंता लागली म्हणून वैराग्य घेतले... आदी ओवींच्या माध्यमातून आपले जीवन कसे असावे याबाबत आपल्या विनोदी शैलीतून मार्गदर्शन केले. काहीही करा- पण मनापासून करा, असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले.