ऐतिहासिक! नागपूरची बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले भारतीय संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 11:33 IST2018-05-10T11:33:17+5:302018-05-10T11:33:29+5:30

युवा प्रतिभावान बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले हिची भारतीय महिला बॅडमिंटन संघात निवड आहे.

Historical! Nagpur's badminton player Vaishnavi Bhale in the Indian team | ऐतिहासिक! नागपूरची बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले भारतीय संघात

ऐतिहासिक! नागपूरची बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले भारतीय संघात

ठळक मुद्दे उबेर चषकासाठी निवड झालेली नागपूरची पहिलीच खेळाडू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: युवा प्रतिभावान बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले हिने नागपूरच्या क्रीडाविश्वात मानाचा तुरा रोवला आहे. विश्व बॅडमिंटन महासंघाद्वारे(बीडब्ल्यूएफ) आयोजित प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी वैष्णवीची भारतीय महिला बॅडमिंटन संघात निवड झाली. या स्पर्धेचे आयोजन बँकॉक येथे २० ते २७ मे या कालावधीत होईल.
महिला एकेरीत वैष्णवी सध्या देशात दुसऱ्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या अ.भा. सिनियर रँकिंग स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे तिची राष्ट्रीय संघात निवड झाली. बालपणापासून वैष्णवीला खेळाचे धडे देणारे तिचे कोच आणि मास्टर्स गटातील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू किरण माकोडे यांनी वैष्णवीचा भारतीय संघात समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याची प्रतिक्रिया माकोडे यांनी व्यक्त केली. माकोडे म्हणाले,‘ वैष्णवीने बालपणापासून खेळ आणि व्यायाम या गोष्टी सातत्याने आत्मसात केल्या आहेत. मी तिच्यासाठी ज्या- ज्या योजना आखल्या, त्या सर्व तिने अमलात आणल्यामुळे भारतीय संघात स्थान मिळविता आले.
खेळाची अपुरी साधने आणि मर्यादित सराव सुविधा असताना वैष्णवीने राष्ट्रीय संघात झेप घेतली, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. वैष्णवीच्या यशामुळे शहरातील इतर बॅडमिंटनपटूंना प्रेरणा मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास उंचावेल, अशी आशा आहे. ’ वैष्णवीसाठी यंदाचे सत्र फारच लाभदायी ठरले. आॅगस्ट महिन्यात चायनीज तायपेई येथे झालेल्या विश्व विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत तिने देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकविले होते.

भारतासाठी खेळण्याचे स्वप्न साकार- वैष्णवी
विदर्भ ब्रिज संघटनेच्या शंकरनगर येथील सभागृहात नियमित सराव करणारी वैष्णवी एलएडी कॉलेजमध्ये बीए च्या दुसऱ्या वर्षाला शिकते. भारतीय संघात निवड झाल्याचे ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती म्हणाली,‘ हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. भारतीय संघात खेळण्याचे मी नेहमी स्वप्न पाहात होते. तो क्षण जवळ आला. सायना नेहवालच्या सोबतीने खेळण्याची संधी मिळणार आहे. मला नेहमी मार्गदर्शन करणारे कोच किरण माकोडे यांचे आभार मानते. या यशात नेहमी पाठिंबा देणाऱ्या आईवडिलांचा मोठा वाटा आहे.’

Web Title: Historical! Nagpur's badminton player Vaishnavi Bhale in the Indian team

टॅग्स :Sportsक्रीडा