राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, दिवसाला अपघातात सरासरी २४ जणांचा मृत्यू

By योगेश पांडे | Published: March 22, 2024 05:51 PM2024-03-22T17:51:18+5:302024-03-22T17:53:49+5:30

राज्यात दररोज सरासरी २४ जणांचा महामार्गांवरील अपघातात मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

Highways in the state have become death traps, an average of 24 people die in accidents every day | राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, दिवसाला अपघातात सरासरी २४ जणांचा मृत्यू

राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, दिवसाला अपघातात सरासरी २४ जणांचा मृत्यू

नागपूर : राज्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्ग चांगले झाले असले तरी वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. महाराष्ट्रातील या दोन्ही प्रकारच्या महामार्गांवर मागील १४ महिन्यांत १९ हजारांहून अधिक अपघात झाले व त्यात सव्वा दहा हजारांहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. राज्यात दररोज सरासरी २४ जणांचा महामार्गांवरील अपघातात मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयात या अपघातांबाबत विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०२३ साली राष्ट्रीय महामार्गावर १० हजार ८५९ अपघात झाले व त्यात ५ हजार ६८१ जणांचे मृत्यू झाले. तर राज्य महामार्गांवर ६ हजार ४० अपघातांत ३ हजार १८१ जणांचे जीव गेले. तर जानेवारी व फेब्रुवारी २०२४ मध्ये राष्ट्रीय महामार्गांवर १ हजार ८१८ अपघातांत ९०० जणांचा बळी गेला व राज्य महामार्गांवरील ९८४ अपघातांमध्ये ५१८ जणांना जीव गमवावा लागला. या १४ महिन्यांच्या कालावधीत १९ हजार ७०१ अपघात झाले व १० हजार २८० नागरिकांचा मृत्यू झाला.
बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करुन वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले.

चार शहरांच्या अंतर्गतच १,४५५ मृत्यू
नागपूर , मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगर या चार शहरांच्याअंतर्गत असलेल्या महामार्गांवर १४ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ४९७ अपघात झाले. त्यात १ हजार ४५५ जणांचा मृत्यू झाला.

‘कार’ सर्वात धोकादायक

२०१९ ते २०२२ या कालावधीत महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात कारचे झाले आहेत. या कालावधीत १७ हजार ८०२ कारचे अपघात झाले व त्यात ७ हजार ५१५ जणांचा जीव गेला. ट्रकचे ६ हजार ४५१ अपघात झाला व २ हजार ६३८ जणांचा मृत्यू झाला. तर बसमुळे २ हजार २९५ अपघात झाले व ५६३ जणांना जीव गमवावा लागला.

वर्षनिहाय अपघात
वर्ष : अपघात (राष्ट्रीय महामार्ग) : मृत्यू (राष्ट्रीय महामार्ग) : अपघात (राज्य महामार्ग) : मृत्यू (राज्य महामार्ग)
२०१९ : ८,३६० : ३,७९९ : ७,२१४ : ३,३४४
२०२० : ६,५०१ : ३,५२८ :५,५१८ : २,९७१
२०२१ : ७,५०१ : ४,०८० : ६,३२८ : ३,४११
२०२२ : ९,४१७ : ४,९२३ : ६,९०२ : ३,८२०
२०२३ : १०,८५९ : ५,६८१ : ६,०४० : ३,१८१
२०२४ ( फेब्रुवारीपर्यंत ) : १,८१८ : ९०० : ९८४ : ५१८

शहरनिहाय अपघात (जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४)
शहर : अपघात : मृत्यू
नागपूर : १,४२६ : ६८२
पुणे : १,४७८ : ४१३
मुंबई : २,८९२ : ४२६
छ.संभाजीनगर : ७०८ : २३४

Web Title: Highways in the state have become death traps, an average of 24 people die in accidents every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.