डोळ्यांच्या कर्करोगामध्ये मुलांचे प्रमाण सर्वाधिक

By Admin | Updated: September 8, 2014 02:21 IST2014-09-08T02:21:06+5:302014-09-08T02:21:06+5:30

लहान मुलांमध्ये डोळ्यांचा कर्करोग ‘रेटीनो ब्लास्टोमा’चे (दृष्टिपटलावर गाठ) प्रमाण सर्वाधिक आहे. देशात दरवर्षी २००० ते २५०० ...

The highest number of children in the eyes of cancer of the eyes | डोळ्यांच्या कर्करोगामध्ये मुलांचे प्रमाण सर्वाधिक

डोळ्यांच्या कर्करोगामध्ये मुलांचे प्रमाण सर्वाधिक

नागपूर : लहान मुलांमध्ये डोळ्यांचा कर्करोग ‘रेटीनो ब्लास्टोमा’चे (दृष्टिपटलावर गाठ) प्रमाण सर्वाधिक आहे. देशात दरवर्षी २००० ते २५०० या आजाराचे रुग्ण आढळून येतात. साधारणत: सहा वर्षांच्या आतील मुलांना हा विकार होतो. तसा विचार केला तर या मुलांवर उपचार करून ही व्याधी दुरु स्त केली जाते पण हा विकार उशिरा जाणवल्यास संबंधित मुलांवर उपचार करणे अवघड जाते. अशा मुलांचे प्रमाण ६० टक्के असते. उपचार न झाल्याने त्यांची कर्करोगग्रस्त बुबळे काढून टाकावी लागतात. निर्दयपणे डोळा काढावा लागतो, पण त्यामुळेच मुलाचा जीव वाचतो, अशी माहिती सेंटर फॉर स्लाईट (सीएफएस) समूहाचे संचालक (मेडिकल सर्व्हिसेस) डॉ. संतोष होनावर यांनी दिली.
एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या नेत्ररोग विभाग व सेंटर फॉर स्लाईट (सीएफएस) हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आय ओपनर : आॅक्युप्लास्टी आॅक्युलर आॅन्कोलॉजी पॅथालॉजी’ या विषयावर रविवारी आयोजित परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी सीएफएस नवी दिल्लीचे आॅक्युलोप्लास्टी व आॅन्कोलॉजी विभागप्रमुख डॉ. विकास मेनन, आॅप्थेल्मिक पॅथालॉजीवर नॅशनल रिपोर्टिंग सेंटर फॉर आॅप्थेल्मिक पॅथालॉजी, सीएफएस, हैदराबादचे संचालक डॉ. कौस्तुभ मुळे, विद्या शिक्षक प्रसारक मंडळाचे (व्हीएसपीएम) अध्यक्ष रणजित देशमुख, एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे अधिष्ठाता सुब्रजीत दासगुप्ता, नेत्ररोग विभाग प्रमुख आणि आयोजन समिती अध्यक्ष डॉ. रेखा खंडेलवाल उपस्थित होत्या.
डॉ. होनावर म्हणाले, या आजाराच्या मुलांना डोळे गमवावे लागू नयेत यासाठी काय करता येईल यावर संशोधन सुरू आहे. खरे तर इतक्या लहान वयात अशा मुलांना डोळ्यांच्याच काय पण कसलाच कर्करोग होता कामा नये. मग तो का होतो याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या संशोधनामध्ये यात मुलात कसलाही दोष नसून अनुवांशिकपणा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
डॉ. दासगुप्ता म्हणाले, अशा परिषदांचा फायदा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना होणे शक्य आहे. नेत्ररोग क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. याला सामोर जाण्यासाठी यासारख्या परिषदा दिशा देण्याचे कामे करतात, असेही ते म्हणाले. डॉ. कौस्तुभ मुळे यांनी नेत्र पॅथालॉजीची आवश्यकता काय, यावर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक डॉ. रेखा खंडेलवाल यांनी केले. त्या म्हणाल्या, संस्थेचे हे रजत जयंती वर्ष आहे. या परिषदेचे आयोजन पदव्युत्तर विद्यार्थी लक्षात ठेवून करण्यात आले आहे. परिषदेला व्हीएसपीएमचे सचिव डॉ. अमोल देशमुख अनुपस्थित होते, परंतु त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. दिवसभर चाललेल्या या सत्रात डॉ. एन.डी.पाटील, डॉ. खंडेलवाल, डॉ. अर्चना निकोसे, डॉ. अमोल ताम्हणे आदींनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

Web Title: The highest number of children in the eyes of cancer of the eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.