काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी सर्वाधिक दावेदार मध्य नागपुरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:37 AM2019-07-30T00:37:24+5:302019-07-30T00:38:30+5:30

सातत्याने पराभवाचा सामना करीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात उत्साह कायम आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतून पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी नेत्यांनी आपापली दावेदारी सादर करीत, सोमवारी झालेल्या मुलाखतीदरम्यान आपल्या विजयाचे समीकरणही समोर ठेवले. यामध्ये सर्वाधिक स्पर्धा मध्य नागपुरात पाहायला मिळाली. उत्तर नागपुरातही तिकीट मिळविण्यासाठी चांगलीच ओढाताण दिसून आली.

The highest contenders for ticket in Congress are from central Nagpur | काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी सर्वाधिक दावेदार मध्य नागपुरातून

काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी सर्वाधिक दावेदार मध्य नागपुरातून

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा लढण्यास इच्छुक उमेदवार आले समोर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सातत्याने पराभवाचा सामना करीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात उत्साह कायम आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतून पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी नेत्यांनी आपापली दावेदारी सादर करीत, सोमवारी झालेल्या मुलाखतीदरम्यान आपल्या विजयाचे समीकरणही समोर ठेवले. यामध्ये सर्वाधिक स्पर्धा मध्य नागपुरात पाहायला मिळाली. उत्तर नागपुरातही तिकीट मिळविण्यासाठी चांगलीच ओढाताण दिसून आली. मुलाखतीनंतर आता मुंबई-दिल्लीवर सर्वांची नजर आहे. कारण तिकिटाचा निर्णय तिथेच होईल. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशावर शहरातील सर्व सहा विधानसभा जागांसाठी सोमवारी देवडिया काँग्रेस भवन येथे मुलाखती सुरू झाल्या. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, गटनेते व आमदार नसीम खान, आ. विनायक देशमुख, किशोर गजभिये यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या.
दक्षिण-पश्चिममधून गुडधे नाही
मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरातून केवळ तीन उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यात शिल्पा बोडखे, किशोर उमाठे आणि रेखा बाराहाते यांचा समावेश आहे. गेली विधानसभा निवडणूक लढणारे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी मुलाखत न देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
दक्षिणमध्ये नवीन चेहरे 
२०१४ मध्ये या मतदार संघातून लढणारे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आता पक्षातून निलंबित आहेत. अशावेळी अनेकांनी येथून आपापली दावेदारी सादर केली आहे. यात पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे, नरेंद्रकुमार दिवटे, गिरीश पांडव, अशोकसिंग चव्हाण, नगरसेवक संजय महाकाळकर, वासुदेव ढोके, मनोहर तांबुलकर, मोरेश्वर साबळे, भाऊराव कोकणे, विशाल मुत्तेमवार, प्रज्ञा बडवाईक यांचा समावेश आहे.
पूर्वमध्ये प्रदेश पदाधिकारी मैदानात 
पूर्व नागपुरातून मागची निवडणूक लढणारे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी पुन्हा येथून तिकीट मागितली आहे. यासोबतच प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दक्षिणसह पूर्व नागपुरातूनही दावा सादर केला आहे. माजी महापौर नरेश गावंडे, नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, संगीता तलमले, अर्जुन वैरागडे, कांता पराते, श्रीकांत कैकाडे हे सुद्धा मैदनात आहेत.
मध्यमध्ये स्पर्धा
मध्य नागपुरात माजी मंत्री अनिस अहमद यांनी सोमवारी आपली दावेदारी सादर केली नाही. परंतु भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी आमदार यशवंत बाजीराव, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, नगरसेवक रमेश पुणेकर, बंटी शेळके, माजी शहराध्यक्ष शेख हुसैन, कांता पराते, नंदा पराते, तौसीफ अहमद, श्रीकांत ढोलके, रमण ठवकर, रमण पैगवार, कमलेश भगतकर, ईश्वर चौधरी, मोतीराम मोहाडीकर, नफीसा सिराज अहमद, आसिफ कुरैशी, प्रीती चौधरी, मोरेश्वर साबळे, शेखर पौनीकर, राजेंद्र नंदनकर, राजेश महाजन, अमन उल्लान खान, रिचा जैन, प्रा. दिनेश बानाबाकोडे मैदानात उतरले आहेत. मध्य नागपुरातून एका उमेदवाराने अल्पसंख्यक समाजाला तिकीट न देण्याची मागणी केली.
पश्चिममध्ये सहा जणांनी केला दावा
शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी या विधानसभा मतदार संघातून आपला दावा सादर केला आहे. त्यांच्यासोबतच तौसीफ बशीर खान व एनएसयूआयच्या कोट्यातून तिकीटची मागणी करणारे अभिषेक वर्धन सिंह, संदेश सिंगलकर, शदाब खान, मोहम्मद वसीम वली मोहम्मद हे सुद्धा इच्छुक आहेत.
उत्तरमध्ये राऊत नाहीत
प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी सध्यातरी उत्तर नागपुरातून आपली दावेदारी सादर केलेली नाही. परंतु रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढणारे किशोर गजभिये यांनी मात्र दावेदारी सादर केली. त्यांच्याशिवाय भावना लोणारे, मालिनी खोब्रागडे, बंडोपंत टेंभुर्णे, संदीप सहारे, माजी आमदार रमेश निकोसे यांचा मुलगा विवेक निकोसे, राकेश निकोसे, स्नेहा निकोसे, महेंद्र बोरकर, मनोज सांगोळे, किशोर दहीवले, धरमपाल पाटील, प्रमोद चिंचखेडे यांनी सोमवारी मुलाखती दिल्या.

 

 

Web Title: The highest contenders for ticket in Congress are from central Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.