हायव्होल्टेज मॅच, शेकडो कोटींचा सट्टा, पाकिस्तानवर पैसे लावणारे बुडाले, विराट सट्टेबाजारात ठरला ‘किंग’
By योगेश पांडे | Updated: February 24, 2025 00:05 IST2025-02-24T00:03:24+5:302025-02-24T00:05:51+5:30
Nagpur News: चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अपेक्षेप्रमाणे विदर्भातूनच शेकडो कोटींचा सट्टा लागला. सामना सुरू होण्याच्या अगोदरच सट्टाबाजाराने भारताच्या विजयाचा अंदाज वर्तविला होता.

हायव्होल्टेज मॅच, शेकडो कोटींचा सट्टा, पाकिस्तानवर पैसे लावणारे बुडाले, विराट सट्टेबाजारात ठरला ‘किंग’
- योगेश पांडे
नागपूर - चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अपेक्षेप्रमाणे विदर्भातूनच शेकडो कोटींचा सट्टा लागला. सामना सुरू होण्याच्या अगोदरच सट्टाबाजाराने भारताच्या विजयाचा अंदाज वर्तविला होता. पाकिस्तानच्या इनिंगमधील २८ ते ३३ ओव्हर्सदरम्यानचा कालावधी सोडला तर पूर्ण वेळ सट्टाबाजाराचा कल भारताकडेच होता. मात्र काही तरी वेगळे घडेल या आशेत ज्या सट्टेबाजांनी पाकिस्तानवर पैसे लावले त्यांना नुकसान सहन करावे लागले.
बुकींसाठी टीम इंडियाच पसंतीचा संघ होता. देशभरातील अनेक प्रमुख बुकींचे पंटर्स ऑनलाईन माध्यमांवरून सक्रिय झाले होते. सामना सुरू होण्याअगोदर मेन इन ब्लू संघाच्या बाजूने रुपयामागे ४७ पैसा व पाकिस्तानवर रुपयामागे १.९८ असा सट्टेबाजीचा दर होता.
सामना सुरू झाल्यावर पाकिस्तानची सुरुवात संथ झाली. मात्र मोहम्मद रिझवान व शकील यांनी १०४ धावांची भागिदारी केल्याने सट्टाबाजाराचा अंदाज चुकतो की काय अशा पोस्ट सोशल माध्यमांवर सुरू झाल्या होत्या. त्यावेळेस पाकिस्तानवर पैसे लागण्यास सुरुवात झाली होती. मात्र ३४ व्या ओव्हरमध्ये रिझवानचा बळी गेल्यावर परत जैसे थे चित्र झाले.अखेरपर्यंत खेळाडूंचे वैयक्तिक स्कोअर, पाकिस्तानच्या गोलंदाजांचे बळी यावर लगवाडी-खायवाडी सुरू होती.
ऑनलाईन लगवाडी-खायवाडीवर भर
नागपूर पोलिसांनी, विशेषतः गुन्हे शाखेने, बेकायदेशीर सट्टेबाजीच्या कारवायांवर कारवाई करण्यासाठी त्यांची दक्षता वाढवली होती. सामन्यादरम्यान संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्यापक योजना आखली होती. बहुतांश सट्टेबाजी विविध ॲप्सच्या माध्यमावर चालते व त्यांचे आकडे सोशल माध्यमांवर व्हायरल होतात. अनेकांनी बेटिंग ॲप्सच्या माध्यमातून भारतावर पैसे लावले होते. काही संकेतस्थळावरूनदेखील हा प्रकार सुरू होता. त्याकडेदेखील पोलिसांचे लक्ष होते.
पंटर्सवर पोलिसांचा वॉच
शहरातील जरीपटका, वर्धमाननगर, सेंट्रल एव्हेन्यू येथील अनेक तरुणांकडून लगवाडी खायवाडी करण्यात येते. तेथील पंटर्सवर पोलिसांची नजर होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातून पाचशे कोटींहून अधिकचा सट्टा लागला आहे.
शुभमन गिल, विराटवर बेटिंग
शुभमन गिल हा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरेल असे सट्टाबाजाराचे अंदाज होते व त्यावरदेखील जोरदार बेटिंग झाले. मात्र गिलवर पैसे लावणारे बुडाले. तर विराट कोहलीवर पैसे लावणारे मालामाल झाले. यासोबतच पाकिस्तान अडीचशेवर स्कोअर करेल की नाही, भारत टार्गेट ४० ओव्हर्सच्या आत पार करेल की नाही यावरदेखील जोरदार बेटिंग झाले.