माथाडी मंडळ अध्यक्षांना हायकोर्टाची अवमानना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 20:05 IST2017-12-19T20:04:17+5:302017-12-19T20:05:52+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नागपूर-वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष विजयकांत पानबुडे यांना अवमानना नोटीस बजावली.

माथाडी मंडळ अध्यक्षांना हायकोर्टाची अवमानना नोटीस
ऑनलाईन लोकमत
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नागपूर-वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष विजयकांत पानबुडे यांना अवमानना नोटीस बजावली.
माथाडी मंडळ गरजेपेक्षा जास्त कामगार पाठवीत असल्यामुळे कंपन्यांवर आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्टस् कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आवश्यकतेनुसारच कामगार पाठविण्याचे निर्देश माथाडी मंडळाला देण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंडळाने कंपनीतील कामाचे सर्वेक्षण केले. दरम्यान, एका क्रेनवर दोन ते तीन कामगारांचीच गरज असल्याचे आढळून आले. त्यानुसार कामगार निश्चित करण्याची ग्वाही मंडळाने न्यायालयाला दिली होती. परंतु, त्यावर अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. मंडळ आताही कंपनीमध्ये अतिरिक्त कामगार पाठवीत आहे. परिणामी कंपनीने न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने पानबुडे यांना यावर ५ जानेवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कंपनीतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा व अॅड. एस. एन. कुमार यांनी कामकाज पाहिले.