हायकोर्ट : रेल्वेत फळे विकणाऱ्याला चार लाख रुपये भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:35 IST2019-08-20T23:34:53+5:302019-08-20T23:35:48+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेतून पडून जखमी झालेल्या फळ विक्रेत्याला चार लाख रुपये भरपाई मंजूर केली.

हायकोर्ट : रेल्वेत फळे विकणाऱ्याला चार लाख रुपये भरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेतून पडून जखमी झालेल्या फळ विक्रेत्याला चार लाख रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम जखमीला तीन महिन्यात अदा करण्याचा आदेश दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला देण्यात आला. त्यानंतर या रकमेवर ७.५ टक्के व्याज लागू होईल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले.
न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. विलास राजेंद्र मेश्राम असे जखमीचे नाव असून तो गोंदिया येथील रहिवासी आहे. तो विनातिकीट रेल्वेत बसला होता हे रेल्वेला सिद्ध करता आले नाही. त्यामुळे तो रेल्वेत अवैधपणे फळे विकत होता असे गृहित धरले तरी, त्याला भरपाई अदा करावी लागेल असे न्यायालयाने रेल्वेला सांगितले.
रेल्वे दावा न्यायाधिकरणने मेश्रामचा भरपाई मिळण्याचा अर्ज खारीज केला होता. मेश्रामकडे तिकीट नव्हते. तसेच, तो रेल्वेत विनापरवानगी फळे विकत होता. त्यामुळे त्याला भरपाई दिली जाऊ शकत नाही असा निष्कर्ष न्यायाधिकरणच्या निर्णयात नमूद करण्यात आला होता. त्या निर्णयाविरुद्ध मेश्रामने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याचे अपील मंजूर करण्यात आले. २९ मार्च २०१२ रोजी मेश्राम गोंदिया येथून भंडाऱ्याला जाण्यासाठी रेल्वेच्या सामान्य डब्यात बसला होता. त्याने तिकीट खरेदी केले होते. रेल्वेत गर्दी होती. त्यामुळे तो दाराजवळ उभा होता. दरम्यान, अन्य प्रवाशांच्या धक्क्यामुळे तो चालत्या रेल्वेतून खाली पडला. परिणामी, त्याचा डावा पाय चाकाखाली येऊन शरीरापासून वेगळा झाला.