हायकोर्ट : दारूमुळे भरपाई नाकारण्याचा निर्णय रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:07 IST2020-02-26T22:06:44+5:302020-02-26T22:07:39+5:30

रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला.

High Court: Decides to deny compensation due to alcohol rejected | हायकोर्ट : दारूमुळे भरपाई नाकारण्याचा निर्णय रद्द

हायकोर्ट : दारूमुळे भरपाई नाकारण्याचा निर्णय रद्द

ठळक मुद्देरेल्वे अपघातात प्रवाशाचे दोन्ही पाय कटले

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : रेल्वे अपघातात दोन्ही पाय कापल्या गेलेल्या प्रवाशाला दारू पिला होता म्हणून भरपाई नाकारण्याचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. प्रवासी प्रमाणाबाहेर दारू पिला होता याचे पुरावे रेकॉर्डवर नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
दारू प्यालेली व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकत नसल्याचे गृहित धरले जाऊ शकत नाही. त्यासाठी व्यक्ती किती दारू पिली होती हे सिद्ध व्हायला पाहिजे. दारूचे प्रमाण निश्चित करण्याकरिता रासायनिक तपासणी करणे आवश्यक आहे. सामान्यत: कमी दारू पिणारी व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकते. परंतु, अधिक प्रमाणात दारू पिणारी व्यक्ती स्वत:ला सांभाळू शकत नाही. परिणामी, व्यक्ती प्रमाणाबाहेर दारू प्यायली होती का याचा निष्कर्ष निघणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणातील अपघातग्रस्त प्रवाशाची अशी तपासणी करण्यात आल्याचे पुरावे रेकॉर्डवर नाहीत असेही उच्च न्यायालयाने सांगितले.
अंकुश रामा अमझारे (३७) असे अपघातग्रस्त प्रवाशाचे नाव असून ते घोराड, ता. सेलू, जि. वर्धा येथील रहिवासी आहेत. १७ मे २०१४ रोजी ते वरोरा येथून वर्धेला जात होते. ते दाराजवळ बसले होते. भूगाव रेल्वे स्थानक येथे अचानक धक्का लागल्यामुळे ते खाली कोसळले. त्यांचे दोन्ही पाय रेल्वेखाली येऊन कापल्या गेले. त्यामुळे त्यांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने अमझारे यांच्याकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही व ते दारू पिऊन रेल्वेत बसले होते या दोन कारणांवरून भरपाईचा अर्ज फेटाळून लावला. त्या निर्णयाविरुद्ध अमझारे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी ते अपील मंजूर केले व वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून न्यायाधिकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द केला. तसेच, अमझारे यांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असे निर्देश मध्य रेल्वेला दिले.

तिकिटाचा मुद्दाही खोडला
अपघातानंतर प्रवाशाकडे रेल्वे तिकीट आढळून आले नाही म्हणून भरपाई नाकारली जाऊ शकत नाही. या प्रकरणातील प्रवाशाने रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले. या परिस्थितीत त्याचे रेल्वे तिकीट हरवल्या जाऊ शकते. अपघातानंतर तो बेशुद्ध झाला होता असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: High Court: Decides to deny compensation due to alcohol rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.