वीज ग्राहकांची छुपी लूट

By Admin | Updated: November 12, 2016 03:10 IST2016-11-12T03:10:05+5:302016-11-12T03:10:05+5:30

ग्रामीण भागातील ग्राहकांना घरगुती विजेचे बिल दर महिन्याला दिले जाते. सदर बिल वेळेवर मिळतेच असे नाही.

The hidden loot of electricity consumers | वीज ग्राहकांची छुपी लूट

वीज ग्राहकांची छुपी लूट

अधिभाराच्या नावावर वसुली : बिलाचा कालावधी महिनाभरापेक्षा अधिक
मनोहर वानखेडे  मालेवाडा
ग्रामीण भागातील ग्राहकांना घरगुती विजेचे बिल दर महिन्याला दिले जाते. सदर बिल वेळेवर मिळतेच असे नाही. ग्राहकाला देण्यात येणाऱ्या प्रत्येक वीज बिलाचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्यात अधिभाराच्या नावाखाली प्रत्येक ग्राहकाकडून मोठी रक्कम दर महिन्याला वसूल केली जात आहे. तसेच काही ग्राहकांना प्राप्त झालेली बिले ही महिनाभरापेक्षा अधिक काळाची असल्याचेही निदर्शनास आले आहे.
महावितरण कंपनीच्या भिवापूर कार्यालयांतर्गत येणाऱ्या मालेवाडा (ता. भिवापूर) येथील वीज ग्राहकांना आॅक्टोबर महिन्याच्या बिलांचे नुकतेच वितरण करण्यात आले. यातील बहुतांश ग्राहकांची बिले ही अवाजवी असल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. बिलात नमूद केलेली वापरलेल्या विजेची रक्कम लक्षात येता ही बिले दीड महिन्यांची आहेत काय, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला.
बिलात नमूद केलेल्या अवाजवी रकमेमुळे मालेवाडा येथील अनेक ग्राहकांनी भिवापूर येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना असंबद्ध उत्तरे देण्यापलीकडे काहीही केले नाही. दर महिन्याला आकारल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या रकमेतून ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची कल्पना सहसा कुणालाही येत नाही.
महावितरण कंपनीचे कर्मचारी दर महिन्याला प्रत्येक ग्राहकाच्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येतात. या रीडिंगमध्ये घोळ होऊ नये म्हणून ते लिहून नेण्याऐवजी थेट मीटरचा फोटो काढला जातो. तरीही बिल देताना वाजवीपेक्षा अधिक रकमेची त्यात आकारणी केली जाते आणि ही रक्कम प्रत्येक ग्राहकाकडून वसुल केल्या जाते. थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून ग्राहकही मुकाट्याने या अवाजवी बिलाच्या रकमेचा भरणा करतात. खरं तर भारनियमनामुळे बराच काळ वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे प्रत्येकाला किमान त्यांनी वापरलेल्या युनिटचे बिल मिळावे ही माफक अपेक्षा असते.
रीडिंग घेणारे कर्मचारी मुद्दाम रीडिंग घ्यायला उशिरा येतात. त्यामुळे वापरलेल्या युनिटची संख्या वाढते. त्यातून विजेच्या बिलाची रक्कमही वाढत जाते. हा प्रकार महावितरणचे अधिकारी अनावधानाने करीत नसून जाणूनबुजून करतात. प्रसंगी विचारणा केल्यास वापरलेले युनिट व युनिटचे वेगवेगळे दर सांगून ग्राहकांची बोळवण करतात. हा सर्व प्रकार ग्रामीण भागातील ग्राहकांना लुटण्यासाठी केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वीज युनिटचे वेगवेगळे दर
प्रत्येक वीज ग्राहकाला त्याने वापरलेल्या विजेच्या युनिटप्रमाणे बिल दिले जाते. एखाद्या ग्राहकाने त्याच्या घरी एका महिन्याला १०० युनिट विजेचा वापर केला असल्यास त्याला प्रति युनिट ३.७६ रुपयांप्रमाणे बिलाची आकारणी केली जाते. याच ग्राहकाने महिनाभरात १०० पेक्षा अधिक युनिट विजेचा वापर केल्यास त्याला तीच वीज ७.२१ रुपये युनिटप्रमाणे खरेदी करण्यात भाग पाडले जाते. रीडिंग घेणारा कर्मचारी नियोजित वेळी रीडिंग घ्यायला आला तर त्या ग्राहकाला समाधानकारक बिल मिळते. हा कर्मचारी रीडिंग घेण्यास उशिरा आल्यास त्या ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतो. कारण कर्मचाऱ्याला रीडिंग घेण्यास विलंब होत असल्याने त्या काळात विजेचा वापर पर्यायने रीडिंग वाढतात. त्यामुळे विजेचे दर वाढतात व बिलही वाढते. रीडिंग घेणारे कर्मचारी रीडिंग घेण्यासाठी मुद्दाम उशिरा येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

Web Title: The hidden loot of electricity consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.