येथे चालताना लागते जीवाची ‘बाजी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:17 IST2018-11-12T22:05:15+5:302018-11-12T22:17:04+5:30

पावनखिंडीत शत्रूवर विजय प्राप्त करून ‘न भुतो न भविष्यति’ पराक्रम गाजविणारे बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव इतिहासात अमर झाले आहे. वीरश्रीने संचारलेला त्यांचा पुतळा रामनगर चौकात लावण्यात आला असून चौकाला त्यांचे नावदेखील देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाला या चौकाचे महत्त्व बहुतेक समजलेलेच नाही. अतिक्रमणामुळे या चौकाची रया तर गेलीच आहे. शिवाय या चौकापासून लक्ष्मीभुवन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चालणे म्हणजे अनेकदा जीवाची ‘बाजी’ लावण्यासारखे झाले आहे.

Here's the 'Baji' while walking | येथे चालताना लागते जीवाची ‘बाजी’

येथे चालताना लागते जीवाची ‘बाजी’

ठळक मुद्देनागपुरातील  बाजीप्रभूनगर चौक झाला ‘चोक’लक्ष्मीभुवन चौकाकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे जामफूटपाथ झाले गायब

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावनखिंडीत शत्रूवर विजय प्राप्त करून ‘न भुतो न भविष्यति’ पराक्रम गाजविणारे बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव इतिहासात अमर झाले आहे. वीरश्रीने संचारलेला त्यांचा पुतळा रामनगर चौकात लावण्यात आला असून चौकाला त्यांचे नावदेखील देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाला या चौकाचे महत्त्व बहुतेक समजलेलेच नाही. अतिक्रमणामुळे या चौकाची रया तर गेलीच आहे. शिवाय या चौकापासून लक्ष्मीभुवन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चालणे म्हणजे अनेकदा जीवाची ‘बाजी’ लावण्यासारखे झाले आहे. जागोजागी अतिक्रमण, गायब झालेले फूटपाथ यामुळे सदासर्वदा येथे वाहतुकीची कोंडी अनुभवयाला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी निवासस्थान आणि आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांचेदेखील निवासस्थान याच परिसराच्या नजीकच आहे. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का व हा भाग मोकळा श्वास घेईल का, असा प्रश्न जनमानसाकडून उपस्थित होत आहे.
तसे पाहिले तर बाजीप्रभूनगर चौक ते लक्ष्मीभुवन चौकाकडे जाणारा मार्ग हा गोकुळपेठ बाजाराजवळ येतो. त्यामुळे सायंकाळी या मार्गावर तशीच गर्दी दिसून येते. मात्र या मार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे की नागरिकांना चालायला फूटपाथदेखील शिल्लक राहिलेले नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणच अतिक्रमण दिसून येत असून सगळीकडे अस्ताव्यस्त गाड्यांचे ‘पार्किंग’देखील होते. त्यामुळे तर पादचाऱ्

यांनादेखील अनेकदा मुख्य रस्त्याच्या मध्यभागाजवळून चालावे लागते. यामुळे येथे मोठा अपघात होण्याचीदेखील शक्यता आहे.

बाजीप्रभूनगर चौकाची रयाच हरविली
बाजीप्रभूनगर चौकात शंकरनगर, रविनगर, धरमपेठ, बाजीप्रभूनगर, शिवाजीनगर व एलआयटीकडून येणारे एकूण सहा रस्त्यांचा संगम होतो. साहजिकच येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या चौकातील प्रत्येक कडेला कुठले ना कुठले अतिक्रमण आहे. हनुमान मंदिराजवळील हारफुलांची दुकाने, धरमपेठकडे जाणाऱ्या मार्गावर चौकात असलेल्या चहाच्या टपऱ्या, किराणा दुकाने इत्यादीमुळे पादचाऱ्यांना चालायलादेखील जागा राहिलेली नाही. शिवाय अनेकदा रस्त्यांवरच वाहने लागत असल्यामुळे तर चौकात दिवसभरातून अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

दुकानदारांकडून अतिक्रमण 

धरमपेठकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. यातील अनेक दुकानदारांनी फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. फर्निचरच्या दुकानदारांकडून फूटपाथवरच सामान मांडल्याचे दिसून येते. तर काही मोबाईलच्या दुकानदारांनी फूटपाथवर मोठमोठे जाहिरातीचे फलक लावून चालण्यासाठी काहीच जागा शिल्लक ठेवलेली नाही. एका सलूनच्या समोर तर फूटपाथ आणि समोरील रस्त्यावर चक्क मंडप टाकून फटाके विकण्यात येत आहेत. या रस्त्यावर एक ‘वाईन शॉप’असून इमारतीचा प्रवेश त्याच्या शेजारूनच होतो. येथील फूटपाथच गायब झाला असून दुकानदाराने त्या जागेवरदेखील आपल्या ‘टाईल्स’ लावल्या आहेत. एका पर्यटन कंपनीकडून तर फूटपाथचा उपयोग सर्रासपणे कर्मचाऱ्यांच्या पार्किंगसाठी करण्यात येत आहे. कुणी जर दुकानदारांना हटकले तर त्यांच्यावर अरेरावी करण्यात येते, अशी नागरिकांनी तक्रार केली आहे. या रस्त्यांवर फूटपाथवर अनेक ‘ज्यूस सेंटर’ तसेच नाश्त्याची दुकानेदेखील आहेत. एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने तर फूटपाथवरच स्टूल वगैरे लावून जागाच बळकावली आहे.

लक्ष्मीभुवन चौकाची कोंडी 

लक्ष्मीभुवन चौकाजवळील भागात तर फूटपाथ काय रस्तादेखील शोधावा लागतो, अशी स्थिती आहे. स्थानिक दुकानदारांनी फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. तर मुख्य रस्त्यावर दुहेरी तिहेरी ‘पार्किंग’ दिसून येते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तर फळविक्रेत्यांनी फूटपाथ आपलाच आहे असे समजून त्यावर कब्जाच केला आहे. शिवाय येथील कपड्याच्या दुकानदारांनीदेखील फूटपाथवर आपली मालकी असल्यासारखा उपयोग सुरू केला आहे. एका दुकानदाराने तर चक्क फूटपाथवरच साड्या लावून जाहिरात केली आहे.

कारवाईसाठी पुढाकारच नाही 

बाजीप्रभूनगर चौक ते लक्ष्मीभुवन चौक या मार्गावरील दुरवस्थेमुळे येथील नागरिक हैराण आहेत. सायंकाळी तर रस्त्यावर चालायचीदेखील भीती वाटते. प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नाही. मोठमोठे नेते, पक्षांचे पदाधिकारी जवळपास राहतात. अगदी मनपाचे झोन कार्यालयदेखील फारसे दूर नाही. असे असतानादेखील अतिक्रमणावर कारवाई करण्याची कुणीही हिंमत करत नाही, असे म्हणत सामान्यांचा कुणी वाली आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

 

Web Title: Here's the 'Baji' while walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.