इथे रावणच आहे उदरनिर्वाहाचे साधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:44 PM2020-09-28T12:44:16+5:302020-09-28T12:44:36+5:30

रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.

Here Ravana is the means of subsistence! Corona Effect | इथे रावणच आहे उदरनिर्वाहाचे साधन!

इथे रावणच आहे उदरनिर्वाहाचे साधन!

Next
ठळक मुद्देपोटाची आग कोण विझविणार?


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा होणारा विजयादशमी महोत्सव रावणदहनासाठी ओळखला जातो. कोरोनामुळे यंदा हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्याचा परिणाम रावणावर निर्भर असलेल्या कारागीर वर्गावर होणार आहे. रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.

बहुसांस्कृतिक देशात प्रत्येक सणोत्सव सर्वसामान्यांना रोजगाराचे प्रमुख कारण असतात. मात्र, यंदा हे सर्वच रोजगार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रामनवमी असो, गणेशोत्सव असो, धम्मचक्र प्रवर्तन दिन असो वा अन्य सर्वच धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे, या उत्सवांवर रोजीरोटी कमावणारे कारागीर रिकाम्या हाताने बसले आहेत. रोज कमवू तर रोज खाऊ, अशा स्थितीत हा वर्ग असतो. त्यातच सणोत्सवाच्या काळात मिळणारा रोजगार पुढच्या काही महिन्यांसाठीच्या उदरनिर्वाहाचे साधन असतात. मात्र, यंदा ते सगळे हिरावले गेले आहेत. महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले खेमकरणसिंग बिनवार हे रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांचे पारंपरिक पुतळे बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या ५०-६० वर्षापासून अखंडितपणे हे कार्य ते करतात. त्यासाठी त्यांच्याकडे १५ ते २० जणांची टीम आहे. जून महिन्यापासून हे कार्य सुरू होते. दरवर्षी ३०च्या वर रावणाचे ऑर्डर्स त्यांच्याकडे असतात. मात्र, यंदा अद्याप एकही ऑर्डर आलेली नाही. २५ ऑक्टोबरला विजयादशमी सोहळा आहे. त्यामुळे, बिनवार आणि इतर कारागीर चिंतेत बसले आहेत.

मेळाव्यात होणारी खेळभांड्यांची विक्री रखडली
शहरात कस्तुरचंद पार्क, चिटणीस पार्क, रेशीमबाग, हनुमाननगर, श्रीकृष्णनगर आणि इतर प्रमुख मैदानांमध्ये रावणदहनाचे जाहीर कार्यक्रम होत असतात. त्यानिमित्ताने जमणाऱ्या मेळाव्यात छोटे-मोठे खेळभांड्यांची विक्री करणारे आपला व्यवसाय करतात. त्यात लाकडी तलवार, दशानन मुख, धनुष्य, बाण आदींचा समावेश असतो. यंदा हे सगळे होणार नाही.

सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेक
मेळावा म्हटला की सांस्कृतिक कार्यक्रम आलेच. त्यात रामलीला, लघुनाट्य, नृत्य, युद्ध प्रात्यक्षिके, गायन यांचा समावेश असतो. यंदा मात्र, मेळावाच भरणार नसल्याने या सगळ्या कार्यक्रमांना ब्रेक लागणार आहे. त्याचा परिणाम या कार्यक्रमांकडून अपेक्षित असलेली आर्थिक गरज पूर्ण होणार नाही.

छोटेखानीच का असेना परवानगी द्यावी - विक्की वानखेडे
कोरोनाची धास्ती प्रचंड आहे. मात्र, पोटाची खळगी भरणेही आहेच. मोठे पुतळे न बनविता पाच ते १५ फुटांचे पुतळेच बनवण्याची परवानगी दिली तर आमची विवंचना संपेल. फिजिकल डिस्टन्सिंगने सोहळे साजरे करता येतील. मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन पाठविले आहे, अशी माहिती कारागीर विक्की वानखेडे यांनी दिली.

 

Web Title: Here Ravana is the means of subsistence! Corona Effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.