हेल्पर, खलाशांकडून रेल्वेगाड्यांची तपासणी

By Admin | Updated: June 13, 2017 01:47 IST2017-06-13T01:47:12+5:302017-06-13T01:47:12+5:30

काही दिवसांपूर्वी रेल्वेगाडीचे कपलिंग, अँकर लिंक तुटल्याच्या घटना घडल्या.

Helper, train check by the sailors | हेल्पर, खलाशांकडून रेल्वेगाड्यांची तपासणी

हेल्पर, खलाशांकडून रेल्वेगाड्यांची तपासणी

कर्मचाऱ्यांचा अभाव : अपघातांची दाट शक्यता
आनंद शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही दिवसांपूर्वी रेल्वेगाडीचे कपलिंग, अँकर लिंक तुटल्याच्या घटना घडल्या. त्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर, रायपूर रेल्वेस्थानकावरील यांत्रिक विभागाला दोषी ठरविण्यात येत आहे. परंतु, नागपूर रेल्वेस्थानकावर परिस्थिती समाधानकारक नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथे यांत्रिक विभागात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे रेल्वेगाड्यांची तांत्रिक तपासणी हेल्पर, खलाशांकडून करून घेण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कॅरेज अँड वॅगन विभागात जवळपास ५०० मंजूर पदे असून यातील ५० पदे रिक्त आहेत. यात सुपरवायझरपासून तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपुरातून दररोज जवळपास १२५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. या गाड्यांची तपासणी यांत्रिक विभागातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
परंतु पदे रिक्त असल्याने अकुशल हेल्पर, खलाशांकडून हे काम करून घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पॅसेंजर यार्डमध्ये येणाऱ्या गाडीची तपासणी याच पद्धतीने होत आहे. रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार येणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीची तपासणी सहा कर्मचाऱ्यांच्या चमूने करावयास हवी. याचे कारण म्हणजे एका कर्मचाऱ्याला काही त्रुटी न आढळल्यास दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात ती बाब यावयास हवी. परंतु प्रत्यक्षात केवळ दोनच कर्मचारी हे काम करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता परिवेश शाहू यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

कुणाकडून करावे
प्लंबर, कारपेंटरचा अभाव
रेल्वेगाड्यांच्या शौचालयात पाईपलाईनमध्ये लिकेज किंवा इतर समस्या आल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी प्लम्बर नाहीत. फाटलेले बर्थ अथवा कारपेंटरच्या इतर कामासाठी कारपेंटरची संख्या कमी आहे. हे काम दुसऱ्याच कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येत असल्याची माहिती आहे. यांत्रिक साहित्याचा पुरवठाही कमी होत असल्यामुळे अनेक कामे न करताच रेल्वेगाड्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Helper, train check by the sailors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.