नागपूर : रस्ते अपघातात अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अव्हर’ मध्ये मदत करणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत मदत करणाऱ्यांना ५ हजार रुपये मिळायचे. आता ते वाढवून २५ हजार रुपये करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.राष्ट्रीय महामार्ग परिवहन आणि न्यूज-१८ लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ते सुरक्षा कार्यक्रमांत शनिवारी अभिनेते अनुपम खेर यांनी गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली. गडकरी यांनी अनुपम खेर यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली.
गडकरी म्हणाले, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला. कायदे कडक केले; तरीही रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत. मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात मुलांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला तर तो कायमस्वरूपी राहतो. त्यामुळे शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहे.
अपघातात ४८ टक्के घटभारतात १० हजार विद्यार्थी हे सदोष ट्रॅफिक व्यवस्थेमुळे तर ३० हजार विना हेल्मेटमुळे दगावतात. नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि रोडमार्क संस्थेने ४८ ब्लॅक स्पॉट दुरुस्त केल्यानंतर अपघातांची संख्या ४८ टक्क्यांनी कमी झाली.
घरी कुणीतरी वाट बघतोय याचे भान ठेवागडकरी म्हणाले, कोरोना, युद्धामध्ये किंवा एखाद्या दंग्यामध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातामध्ये होतात याची खंत वाटते.देशात आणखी उत्तम रस्ते तयार होतील. पण लोकांना शिस्त नसेल तर याचा काहीही उपयोग नाही. सिग्नल तोडणे, वेग मर्यादा ओलांडणे, हेल्मेट नसणे अशा कितीतरी चुका लोक करतात. घरी आई, पत्नी, मुले वाट बघत असतील, हे ध्यानात ठेवून गाडी चालवावी. रस्ते सुरक्षा क्षेत्रात काम करणारे राजू मानकर आणि चंद्रशेखर मोहिते यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.