२२ दिवसांपासून थांबल्या हृदय शस्त्रक्रिया
By Admin | Updated: November 3, 2014 00:40 IST2014-11-03T00:40:55+5:302014-11-03T00:40:55+5:30
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) शस्त्रक्रिया गृह तब्बल २२ दिवसांपासून बंद आहे. बांधकाम विभागाच्या गलथानपणाचा फटका हृदयरुग्णांना

२२ दिवसांपासून थांबल्या हृदय शस्त्रक्रिया
सुपर स्पेशालिटी रुग्णालय : बांधकाम विभागाच्या गलथानपणाचा फटका रुग्णांना
नागपूर : सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभागातील (सीव्हीटीएस) शस्त्रक्रिया गृह तब्बल २२ दिवसांपासून बंद आहे. बांधकाम विभागाच्या गलथानपणाचा फटका हृदयरुग्णांना बसत असल्याने त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत तब्बल ५० वर रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.
हृदयरोग हा आजार आता केवळ श्रीमंतांचाच राहिलेला नाही, तो झोपडपट्टीपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य गरीब माणसाला हृदयरोग झाल्यास अत्यंत कमी खर्चात उपचार मिळावेत या दृष्टीने मेडिकल रुग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हृदयरोग व उरोशल्यचिकित्सा विभाग सुरू झाला. खासगी रुग्णालयासही लाजवेल असे या विभागाचे शस्त्रक्रिया गृह आहे. या विभागात बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी करण्यात येतात. रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू झाल्यापासून येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. बाह्यरुग्ण विभागात रोज तीन ते चार रुग्ण शस्त्रक्रियेसाठी येतात. यामुळे प्रतीक्षेची यादी शंभरावर गेली आहे, असे असताना या विभागाचे शस्त्रक्रिया गृह तब्बल तीन आठवड्यांपासून बंद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया गृहातील पाईपलाईनला गळती लागली होती. याच्या दुरुस्तीसाठी मेडिकलच्या बांधकाम विभागाला सूचना देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याने याची पाहणी करून दोन-चार दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र २२ दिवस या कामासाठी लावले. या दिवसांत एकही बायपास सर्जरी झाली नाही. परिणामी शस्त्रक्रिया रुग्णांची यादी फुगली. सध्याच्या घडीला गंभीर रुग्णांचे नातेवाईक शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांकडे तगादा लावत आहे तर काही आजी-माजी आमदारांकडून वरिष्ठ डॉक्टरांवर दबाव आणत आहे. परंतु शस्त्रक्रिया गृहच बंद असल्याने डॉक्टर हार्ट सर्जरी होणार नसल्याचे रु ग्णांना सांगत आहे. अनेक रुग्ण पदरमोड करून खाजगी रु ग्णालयाचा रस्ता धरत आहे. (प्रतिनिधी)