उपराजधानीतील हृदय विकाराचे रुग्ण धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:35 AM2020-02-22T11:35:27+5:302020-02-22T11:36:59+5:30

हृदयाचे आकुंचन झालेली झडप उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तब्बल तीन महिन्यापासून तुटवडा आहे. साहित्य आज येईल, उद्या येईल या प्रतीक्षेत रुग्णांवर जीवघेणी वेळ आली आहे.

Heart disease patients at risk in sub-capital | उपराजधानीतील हृदय विकाराचे रुग्ण धोक्यात

उपराजधानीतील हृदय विकाराचे रुग्ण धोक्यात

Next
ठळक मुद्देसाहित्याअभावी रुग्णांच्या जीवाशी खेळ तीन महिन्यापासून ‘बलून’चा तुटवडा

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध आजारांच्या मृत्यूमध्ये ३० ते ३५ टक्के मृत्यू हा हृदयविकारांमुळे होतो. प्रत्येकी ३३ व्या सेकंदाला हृदयविकाराचा झटका येतो. झटक्यानंतर येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे नऊ ते दहा टक्के आहे. यामुळे हृदयविकारावर तातडीने उपचार करणे महत्त्वाचे ठरते. परंतु गरिबांसाठी आशेचे किरण असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये याच्या उलट चित्र आहे. हृदयाचे आकुंचन झालेली झडप उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा तब्बल तीन महिन्यापासून तुटवडा आहे. साहित्य आज येईल, उद्या येईल या प्रतीक्षेत रुग्णांवर जीवघेणी वेळ आली आहे.
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय विकाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आठवड्यातून दोनच दिवस असलेल्या ‘ओपीडी’मध्ये रुग्णांची संख्या ५०० वर जाते. इतर दिवशी १५ ते २० अ‍ॅन्जिओग्राफी तर पाच ते दहा अ‍ॅन्जिओप्लास्टी होते.
महिन्यातून सहा ते सात ‘बलून मायट्रल व्हॉल्व्होटॉमी’ होते. सध्या याच आजाराचे रुग्ण अडचणीत आले आहेत. या आजारात हृदयातील मायट्रल व्हॉल्व्ह (झडप) मुख्यत: खराब होऊन आकुंचन पावते. झडपा जाड होऊन त्या पूर्णपणे उघडत नाहीत. रक्तप्रवाह आकुंचित झालेल्या झडपेतून कमी होतो. जर झडप खूपच आकुंचित झाली असेल तर अ‍ॅन्जिओप्लास्टीप्रमाणे बलूनच्या (फुगा) साहाय्याने चिरफाड न करता ती झडप उघडली जाते. याला ‘बलून मायट्रल व्हॉल्व्होटॉमी’ म्हणजेच ‘फुग्याने झडप उघडणे’ असे म्हणतात. हा आजार लहानपणी ‘हृमॅटिक फिवर’ होऊन त्यावर योग्य औषधोपचार न घेतल्यास आणि इतरही कारणांमुळे होतो. या रोगाच्या उपचारासाठी लागणाºया ‘बलून’चा तुटवडा आहे. गेल्या तीन महिन्यापासून हा तुटवडा असल्याची माहिती आहे.
स्थानिक पातळीवर होते खरेदी
‘बलून मायट्रल व्हॉल्व्होटॉमी’चे सर्वाधिक रुग्ण हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजनेतील असतात. यामुळे या रुग्णांसाठी लागणारे ‘बलून’ स्थानिक पातळीवर खरेदी केले जातात. एका बलूनची किमत ४५ ते ५० हजार असते. रुग्णालय प्रशासनाने काही महिन्यांपूर्वीच पुरवठादाराला बलूनची ‘आॅर्डर’ दिली. परंतु त्यांनी अद्यापही हे साहित्य उपलब्ध करून दिले नसल्याची माहिती आहे.
जीव मुठीत घेऊन जगत आहे रुग्ण
‘हृमॅटिक मायट्रल स्टेनोसीस’ म्हणजेच हृदयाचं व्हॉल्व आकुंचन पावणे असे म्हणतात. या आजाराची ४५ वर्षीय सुरेखा खंडाते नावाची रुग्ण मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये उपचार घेत आहे. त्यांचा भाऊ प्रभू कुमरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘सुपर’मध्ये ‘बलून’ नसल्याने शस्त्रक्रिया थांबविण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून ‘सुपर’च्या चकरा मारीत आहे. बहीण जीव मुठीत घेऊन जगत आहे. तिला काही झाल्यास रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील, असेही तो म्हणाला. प्रभा खवसे (३८) नावाची महिलाही गेल्या काही महिन्यापासून शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाच्या चकरा मारीत आहे.

Web Title: Heart disease patients at risk in sub-capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य