कुही तालुक्यातील आरोग्य सेवा ऑक्सिजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:22+5:302021-05-25T04:09:22+5:30
कुही : कुही तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व १० उपकेंद्र आहेत. मात्र येथे कर्मचाऱ्यांची ४० टक्के ...

कुही तालुक्यातील आरोग्य सेवा ऑक्सिजनवर
कुही : कुही तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व १० उपकेंद्र आहेत. मात्र येथे कर्मचाऱ्यांची ४० टक्के पदे रिक्त असल्याने कोरोना संक्रमण काळात आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर आली आहे. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असताना तालुक्यातील ६ सीएचओ नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर आहे, हे विशेष.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तालुक्याला अधिक फटका बसला. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने अनेक रुग्णांचा जीव गेला. त्यामुळे आतातरी बोध घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने कुही तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करावी अशी मागणी होत आहे. शासनाने डॉक्टर्स, परिचारिका, औषधी वितरक, एमपीडब्ल्यू, शिपाई यांची पदे तातडीने भरावी अशी मागणी होत आहे. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने व रुग्णांचे हाल होत असल्याने मातोश्री प्रभादेवी सेवा संस्थेचे संस्थापक प्रमोद घरडे यांनी कुही, उमरेड, भिवापूर येथे ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सीमीटर, मास्क वितरण व घरोघरी निर्जंतुकीकरण असे उपक्रम राबविले.
तालुक्यात मांढळ, वेलतूर, साळवा, तितूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कुही येथे ग्रामीण रुग्णालय आहे. याशिवाय राजोला, तारणा, वेळगाव,पचखेडी,फेगड,जीवनापूर, कुजबा अडम असे आठ आयुर्वेद दवाखाने आहेत. मांगली व डोंगरगाव येथे दोन ॲलोपॅथिक दवाखाने आहेत. आता नव्याने कुही-सिल्ली येथे कोविड सेंटर उभारण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करुन शासनाने इमारती उभ्या केल्या मात्र डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अभावी रुग्णसेवा कोलमडली आहे. राजोला, कुजबा, अडम या तीन दवाखान्यात डॉक्टरच नाहीत तारणा, डोंगरमौदा, गोठणगाव येथे परिचारिकाच नाही. ३६ हजार लोकसंख्येचे आरोग्य सांभाळणाऱ्या मांढळ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच परिचारिका आहे. कोरोना कालावधीत डॉक्टर व परिचारिका यांना सकाळी ओपीडी नंतर लसीकरण व पॉझिटिव्ह रुग्ण भेटी अशी कामे करावी लागतात. एकाच डॉक्टरकडे तीन-तीन दवाखान्याचा प्रभार आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या संक्रमणातून वाचविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पदभरती करावी अशी मागणी प्रमोद घरडे यांनी केली आहे.