हेल्थ लायब्ररी:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ‘डेल्टा प्लस’ जबाबदार असेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:40+5:302021-06-27T04:06:40+5:30

-दुसऱ्या लाटेचा परिणाम काय झाला? संसर्गाचा वेगाने प्रसार आणि प्राणघातकामुळे दुसऱ्या लाटेने विनाश ओढवून घेतला. भारतात अनेक आठवड्यांपर्यंत दररोज ...

Health Library: Will Delta Plus be responsible for the third wave of corona? | हेल्थ लायब्ररी:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ‘डेल्टा प्लस’ जबाबदार असेल?

हेल्थ लायब्ररी:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ‘डेल्टा प्लस’ जबाबदार असेल?

-दुसऱ्या लाटेचा परिणाम काय झाला?

संसर्गाचा वेगाने प्रसार आणि प्राणघातकामुळे दुसऱ्या लाटेने विनाश ओढवून घेतला. भारतात अनेक आठवड्यांपर्यंत दररोज पाच हजारांपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली. संक्रमित लोकांची संख्या लाखोंमध्ये होती. आता दुसरी लाट ओसरत असताना काही लोकांमध्ये फुफ्फुस, मूत्रपिंड, हृदय आणि रक्तवहिन्यासंबंधी आजार उद्भवले आहेत.

-तिसऱ्या लाटेचे काय होईल?

तिसऱ्या लाटेबद्दल अद्यापही संभ्रम आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, येत्या एक-दोन महिन्यांत भारताला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. या लाटेचे कारण ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ असण्याचा अंदाज लावला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत संक्रामक प्रकार ‘बी .१.६१७.२’ने कहर केला होता. आता हा प्रकार अधिक संसर्गजन्य ‘ए व्हाय.१ या डेल्टा प्लस’मध्ये बदलला आहे.

-डेल्टा प्लसमुळे किती लोक प्रभावित?

‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’चे ४०पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशात याचे रुग्ण दिसून आले आहेत.

-डेल्टा प्लसला चिंताजनक प्रकार का म्हटले जात आहे?

याची दोन प्रमुख कारणे आहेत. हा विषाणू खूप संक्रामक आहे. याचा अर्थ की तो पूर्वीच्या विषाणूपेक्षा वेगाने पसरतो. दुसरे म्हणजे, या विषाणूला मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडी उपचाराद्वारे देखील नियंत्रित केले जाऊ शकत नाही. भारतात कोरोनाचा सामान्य व काही गंभीर रुग्णांमध्ये ‘मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडी’ एक नवीन उपचार पद्धती आहे.

-डेल्टा प्लस व्हेरिएंट विरूद्ध लस प्रभावी आहे?

विषाणूचा प्रत्येक नवीन प्रकार या प्रश्नास जन्म देतो. कारण, त्या काळातील विषाणूचा प्रकारावरून संबंधित लस विकसित केली गेली असते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असा दावा केला आहे की, सध्या उपलब्ध कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन दोन्ही डेल्टा प्लस व्हेरिएन्ट विरूद्ध प्रभावी आहे.

-डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कोणाला जास्त धोका आहे?

ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले नाहीत. त्यांना डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आहे.

-तज्ञ कोणत्या प्रकारचे धोरण सुचवित आहेत?

सध्या या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या फार कमी दिसून येत आहे. मात्र, लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याची गरज आहे. सोबतच अधिक सतर्कता, संशयितांच्या चाचण्या, तात्काळ ट्रेसिंग आणि लसीकरणाला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबले पाहिजे. यूके प्रमाणे आम्हालाही लसीकरणाची गती वाढवावी लागेल. ज्यांनी लस दिली आहे त्यांच्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरिएन्टची लक्षणे अतिशय सौम्य असतात.

-लसीकरणाची स्थिती?

दुर्दैवाने, जर लस घेतलेल्या लोकांमध्ये डेल्टा प्लस संसर्गाचे प्रकरणे समोर आले तर लसमध्ये सुद्धा नवीन स्ट्रेनला हाताळण्यासाठी संशोधन करावे लागेल.

-सध्याचे लसीकरण धोरण?

आता बरेच लोक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. तरीही अनेकांमध्ये पूर्वग्रह आणि गैरसमज आहेत. लसीकरणामुळे नपुंसकत्व किंवा वंध्यत्व किंवा इतर कोणत्याही रोगाचा धोका होत नाही, किंवा यामुळे रक्तस्त्राव किंवा ‘ब्लड क्लॉटिंग’ देखील होत नाही. उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा टीबी असलेल्यांना किंवा मासिक पाळी दरम्यान देखील ही लस दिली जाऊ शकते. हृदयरोगाच्या रुग्णांना, बायपास शस्त्रक्रिया आणि अँजिओप्लास्टी झालेल्या लोकांना देखील ही लस देता येते.

-‘डेल्टा प्लस’ हा प्रकार अस्तित्त्वात का आला?

सर्व विषाणूंमध्ये परिवर्तित होण्याची किंवा बदलण्याची जन्मजात प्रवृत्ती असते. विषाणू जितक्या वेगाने पसरतो तितक्याच वेगाने त्यात बदल होण्याची शक्यता अधिक असते.

-कुठली खबरदारी घेणे आवश्यक आहे?

कोरोनाचे नियम पाळले पाहिजे. लस घेणे गरजेचे आहे. डबल मास्क लावायला हवा. त्यापैकी एक ‘एन ९५’ मास्क असायला हवा. गरज असल्यावरच बाहेर पडायला हवे. सामाजिक अंतर आणि वारंवार हाताची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

Web Title: Health Library: Will Delta Plus be responsible for the third wave of corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.