हेल्थ लायब्ररी : टाच दुखणे, कारण आणि उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST2021-02-05T04:57:30+5:302021-02-05T04:57:30+5:30
-टाच दुखण्यामागील सामान्य कारण? तळव्यांमध्ये स्थित ऊतकांच्या गटामध्ये जळजळ (प्लँटर फेसायटिस), टाचेच्या जागी हाडांचा अतिरिक्त विकास (कॅल्सेनील स्पर्स) टाचेमध्ये ...

हेल्थ लायब्ररी : टाच दुखणे, कारण आणि उपचार
-टाच दुखण्यामागील सामान्य कारण?
तळव्यांमध्ये स्थित ऊतकांच्या गटामध्ये जळजळ (प्लँटर फेसायटिस), टाचेच्या जागी हाडांचा अतिरिक्त विकास (कॅल्सेनील स्पर्स) टाचेमध्ये वेदना होण्याची सामान्य कारणे आहेत. ‘एचिल्स टेंडन’मध्ये सूज येणे, बर्सायटिस, अँकिलोजिंग स्पाँडिलायटिस, रिअॅक्टिव्ह आर्थरायटिस, लचक व इतरही काही कारण आहेत. मधुमेहामध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथीदेखील टाचेच्या वेदनांचे कारण ठरू शकते.
- डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?
घरगुती उपचाराने टाच दुखणे कमी होत नसेल आणि औषधी घेऊनही दुखणे वाढत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. जर एखाद्या दुखापतीमुळे टाचमध्ये तीव्र दुखणे किंवा लाल पडले असेल, सुन्न झाले असेल, मुंग्या येत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवायला हवे.
-प्लँटर फेसायटिस म्हणजे काय?
यात चाकूने खुपासल्यासारखा टाचेच्या जवळ पायात दुखणे होते. हे दुखणे असह्य असते. झोपेतून उठल्यानंतर जमिनीवर पाय ठेवल्यावर हे दुखणे होते. बराच वेळ विश्रांती घेतल्यानंतरही हे घडते. ही वेदना केवळ व्यायामादरम्यानच नव्हे तर व्यायामानंतरही आणखी तीव्र होते.
-प्लँटर फेसायटिस होण्याची शक्यता कशामुळे वाढते?
प्लँटर फेसायटिस होणे हे ४० ते ६० वर्षे वयोगटात सामान्य बाब आहे. लांब पल्ल्याच्या धावपळीनंतर आणि काही खास व्यायामानंतरही वेदना होऊ शकते. लठ्ठपणा, ‘हाय आर्क्ड’ म्हणजे धनुष्यकार पाय आणि सपाट पायदेखील याला कारण ठरू शकतात. जास्त काळ कठोर पृष्ठभागावर उभे असताना ही समस्या अधिकच वाढू शकते. वजनावर नियंत्रण, आरामदायक शूज, पायांवर बर्फ पडणे आणि तळवे वाकविण्याचा व्यायामाचा फायदा होऊ शकतो. स्टिरॉईड इंजेक्शन, फिजिओथेरपी, अल्ट्रासोनिक टिश्यू रिपेरिंग, रात्रीचे स्प्लिंट्स, टाचेच्या आकारानुसार आधार याचा फायदा होऊ शकतो.
-आर्थरायटिसचा टाच दुखण्याशी संबंध?
जर झोपेतून उठल्यावर पाठ, मानेत आणि टाचेमध्ये एक तासापेक्षा जास्त दुखणे आणि कडकपणा राहत असेल तर टाच दुखण्याला आर्थरायटिसचा संबंध असू शकतो. याचा अँकिलोजिंग स्पाँडिलायटिस, सोरायसिस, इन्फ्लेमेटरी बोवेल डिसिज किंवा रिॲक्टिव्ह आर्थरायटिसशी संबंध असू शकतो.
- कॅल्सेनील किंवा टाच स्पर म्हणजे काय?
टाचेच्या जागी हाडांचा अतिरक्त जमाव्यास ‘स्पर’ म्हणतात. ‘एक्स-रे’मधून हे दिसून येते. हे आर्थरायटिस, जास्त वजन, खराब फिटिंग शूज, फाटलेले शूज, चप्पल घातल्यानेसुद्धा होऊ शकते. आईस पॅक, वेदनांच्या ठिकाणी स्टेरॉईड्स इंजेक्शन देणे, वेदनाशामक औषधी, फिजिओथेरपी, व्यायाम आणि स्ट्रेचिंगसोबतच हील पॅड्स आराम देण्यास उपयुक्त ठरतात.
-टाच दुखण्यामध्ये कोणती तपासणी आवश्यक?
मधुमेह, युरिक अॅसिडची तपासणी आणि नियमित रक्त तपासणी आवश्यक आहे. रक्तपुरवठा आणि नसाच्या कार्याचे मूल्यांकन करणे आवश्यक असते. आर्थरायटिससाठी काही रक्ताची तपासणी आणि पायांच्या टाचेसह एक्स-रेसुद्धा केले जातात. बहुतेक प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या तपासणीतही निदान होते.
- टाचेमध्ये वेदना टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय?
पायात चांगले फिट होईल असे शूज घालायला हवे. आर्थरायटिस, मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या घटकांवर नियंत्रण ठेवायला हवे. नियमित आणि योग्य शारीरिक हालचाली आणि पायांचा व्यायाम करायला हवा.