हेल्थ लायब्ररी : निरोगी लोकांनादेखील वार्षिक तपासणी करावी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST2021-09-26T04:08:57+5:302021-09-26T04:08:57+5:30
- निरोगी व्यक्तीने वैद्यकीय चाचणी कधी करावी? यासंदर्भात कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाही. परंतु वयाच्या २५ व्या वर्षापासून ...

हेल्थ लायब्ररी : निरोगी लोकांनादेखील वार्षिक तपासणी करावी?
- निरोगी व्यक्तीने वैद्यकीय चाचणी कधी करावी?
यासंदर्भात कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाही. परंतु वयाच्या २५ व्या वर्षापासून वार्षिक तपासणीची सुरुवात चांगली असल्याचे म्हटले जाते. जे लोक लहानपणी लठ्ठ आहेत आणि ज्यांच्या कुटुंबात स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी ही वयाची अट पाळू नये. विशेषत: ज्यांच्या कुटुंबात लहान वयात अज्ञात कारणांमुळे अचानक मृत्यू झाला आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकर तपासणी करणे गरजेचे ठरते.
- हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत?
तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक तीव्र असते. यामुळे त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. झटका टाळण्यासाठी धूम्रपान व तणावाला दूर ठेवत वजन नियंत्रणात ठेवायला हवे. सोबतच उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाच्या चाचण्या करायला हव्या. कुटुंबात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कुणाचा मृत्यू झाला असल्यास ‘बेसलाईन ईसीजी’ आणि ‘इकोकार्डियोग्राम’ करणे गरजेचे ठरते.
- कर्करोगाची स्थिती?
कोलोन कर्करोग, स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग व काही प्रकारचे रक्त कर्करोग आणि लिम्फोमादेखील अनुवांशिक असू शकतात. म्हणून या कर्करोगाची ओळख पटविण्यासाठी चाचण्या केल्या पाहिजेत. जितक्या लवकर कर्करोगाचे निदान होईल, रुग्णाच्या जिवंत राहण्याची शक्यता तेवढीच वाढते.
- आज उपलब्ध वार्षिक चाचण्या पुरेशा आहेत का?
चाचणीचा निर्णय संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांनी घेतला पाहिजे. सीबीसी, केएफटी, एलएफटी, लिपिड प्रोफाईल आणि मधुमेहासारख्या नियमित चाचण्यांमधून कर्करोगाचे निदान होत नाही. यामुळे व्यक्तीचे आरोग्य पाहून चाचण्या करायला हव्या. चाचणीचे नियोजन करताना अनुवांशिक रोगांचा विचार करणेदेखील आवश्यक ठरते.
- वार्षिक चाचणीची मर्यादा?
आपण वर्षाला करीत असलेल्या रुटीन चाचण्याला मर्यादा आहेत. यात मानसिक आजार ओळखता येत नाही. या चाचण्यांद्वारे, टीबी, डेंग्यू किंवा कोरोना विषाणूचा हल्ला रोखू शकत नाही. या चाचण्यातून केवळ भविष्यात होणारे रोग ओळखता येतात. त्यामुळे भविष्यातील धोका कमी करता येऊ शकतो.
- तर मग वार्षिक तपासणीचे महत्त्व काय?
वार्षिक तपासणीमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि यकृत-मूत्रपिंडाच्या आजारांमध्ये लवकर निदान फायदेशीर ठरते. कमी हिमोग्लोबिन, ‘बी -१२’ आणि ‘व्हिटॅमिन डी’ची पातळी ओळखून त्यावर उपाययोजना करता येऊ शकते. भविष्यातील आजार रोखण्यास मदत होऊ शकते. हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायूच्या शक्यतेचे निदान झाल्याने त्याच्यापासून वाचता येऊ शकते.
- चाचण्या करून रोगाला कसे टाळता येईल?
कौटुंबिक डॉक्टरांशी सल्लामसलत करून वार्षिक तपासणीचे नियोजन करायला हवे. जर अहवाल सामान्य असला तरीदेखील तो डॉक्टरांना दाखवायला हवा. सोबतच अहवालानुसार आहार, व्यायाम आणि वजन याबाबत चर्चा करायला हवी. आपल्या व्यसनाबद्दल (असल्यास) आणि मानसिक आरोग्याबद्दल डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलायला हवे.
- तर वषार्नुवर्ष निरोगी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
तुमचा वार्षिक वैद्यकीय अहवाल सामान्य असेल तर तुम्हाला बरे वाटेल. परंतु अहवाल सामान्य असला तरी निष्काळजीपणा करू नये. लठ्ठपणा कमी करणे, धूम्रपान-अल्कोहोलचे व्यसन सोडणे आणि नियमित व्यायाम करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळविणे महत्त्वाचे ठरते.
आज, वार्षिक वैद्यकीय तपासणी एक महत्त्वाची बाब झाली आहे. परंतु या चाचण्या व्यक्तीच्या गरजा लक्षात घेऊन केल्या पाहिजेत. निरोगी जीवनशैलीसाठी या चाचण्या पर्याय नसल्या तरी उपायोगी आहेत.