सावनेर : डिगडाेह (ता. हिंगणा) येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्या वतीने सावनेर शहरातील जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात निशुल्क राेगनिदान शिबराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात स्थानिक व तालुक्यातील २७५ नागरिकांची तपासणी करून गरजूंवर औषधाेपचार करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिराचेही आयाेजन करण्यात आले हाेते.
शिबिराचे उद्घाटन माजी आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. अरविंद लोधी, ॲड. चंद्रशेखर बरेठिया, ॲड. शैलेश जैन, नगरसेवक सचिन उईके, सुजित बागडे, आयएमएचे सावनेर शाखा अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे, डॉ. विजय धोटे, डॉ. संदीप गुजर, मुख्याध्यापक कृष्णकांत पांडव, संजय मोवाडे उपस्थित हाेते. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते काेराेना संक्रमणकाळात नागरिकांना सेवा देणाऱ्या व्यक्तींचा गाैरव करण्यात आला. डॉ. केतन देवडिया यांनी नागरिकांना हाेणारे विविध आजार आणि त्या आजारांमध्ये घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्याच नेतृत्वात तज्ज्ञ डाॅक्टरांनी नागरिकांच्या विविध आजारांची तपासणी केली. सूत्रसंचालन कमल बुऱ्हान यांनी केले. विजय साबळे यांनी आभार मानले.