गांधीजींशी निष्ठा बाळगणारे धडा शिकवतीलच
By Admin | Updated: January 16, 2017 02:07 IST2017-01-16T02:07:19+5:302017-01-16T02:07:19+5:30
खादी ग्रामोद्योगच्या वार्षिक दिनदर्शिका आणि डायरीवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चरख्यावर सूत काततानाचे फोटो हटवून

गांधीजींशी निष्ठा बाळगणारे धडा शिकवतीलच
फोटो बदलावरून गांधीवाद्यांची पंतप्रधान मोदींवर टीका
नागपूर : खादी ग्रामोद्योगच्या वार्षिक दिनदर्शिका आणि डायरीवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चरख्यावर सूत काततानाचे फोटो हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आल्याने विविध स्तरातून या प्रकारावर टीका केली जात आहे. नागपुरातील गांधीवादी विचारवंतांनी या कृतीवर संतप्त मात्र संयमित प्रतिक्रिया दिली आहे. चरखा हे गांधीजींच्या स्वावलंबनाचे आणि स्वदेशी चळवळीचे प्रतीक आहे. गांधीजी हे केवळ देशासाठी नाही तर जगासाठी युगपुरुष आहेत व त्यांचे महात्म्य जगाने मान्य केले आहे. भारतातील केवळ मागची पिढी नाही तर आजची तरुण पिढीही गांधीजींवर आत्यंतिक प्रेम आणि निष्ठा बाळगणारी आहे. त्यामुळे गांधीजींच्या ऐवजी स्वत:चा फोटो लावला म्हणून त्यांच्याएवढी उंची गाठता येईल काय, असा सवाल गांधीवाद्यांनी केला. भारतीय जनमानस हे अतिक्रमण खपवून घेणार नाहीच, मात्र वेळ आली तर अशा कृतीसाठी धडाही शिकवेल, अशा भावना या विचारवंतांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.(प्रतिनिधी)
स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न
नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर पंतप्रधान झाल्यापासून स्वत:ची प्रतिमा मोठी करण्याचा सतत प्रयत्न केला आहे. अडीच वर्षापासून त्यांना हा मोह झाला आहे. त्यांनी भाजपाच्या नेत्यांनाही बाजूला सारून हा प्रयत्न चालविला आहे. स्वच्छता ही गांधीजींच्या १७ कार्यक्रमापैकी एक होती. मोदींनी गांधीजींना सामान्य प्रतीक म्हणून ओढले आणि स्वप्रतिमा उंचावली. खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरील फोटो पोज हा तसाच एक केविलवाणा प्रयत्न आहे. स्वत:चा प्रचार करून महापुरुष बनण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र आपल्याला हे पहावे लागेल. कारण आपण त्यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिले आहे. भारतीय लोकशाहीत अमेरिकेप्रमाणे ‘ही इज नॉट अवर प्रेसिडेंट’ म्हणण्याची प्रगल्भता आलेली नाही. आज फोटो काढण्यापुरता कार्यक्रम आहे, पुढे पहा काय होते?
- मधुकर निसळ, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत
त्यांची उंची गाठता येईल काय?
गांधीजींनी या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले आहे आणि त्यांचा चरखा हे भारताच्या सर्वंकष समाजपरिवर्तनाचे अहिंसक प्रतीक आहे. आजचे सत्ताधारी या प्रतीकावरच अतिक्रमण करू पाहत आहेत. एकहाती सरकार चालवित असले तरी त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. जनता आपल्याबरोबर आहे की नाही असा त्यांना वारंवार संशय येतो व यातून अशी कृती केली जाते. वर्तमान पिढी परिवर्तनवादी आणि कृतिशील आहे. मात्र त्यांच्यात असलेली निष्ठा महत्त्वाची आहे. या पिढीचीही निष्ठा गांधीजी आणि चरख्याशी बांधील आहे. त्यामुळे त्यांच्या निष्ठेवर केलेले अतिक्रमण ही पिढी खपवून घेणार नाही. खादी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे त्याच निष्ठेचे प्रतीक आहे. गांधीजी हे संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी युगपुरुष आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो काढून त्याजागी स्वत:चा फोटो लावल्याने त्यांच्या व्यक्तित्वाची उंची गाठता येईल असा विचार अशा कोत्या विचाराच्या लोकांनी करू नये.
- लीलाताई चितळे, ज्येष्ठ गांधीवादी
नव्या पिढीमध्ये खादीचे आकर्षण
गेल्या सहा-सात वर्षात खादीच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. नवीन पिढीमध्ये खादीचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे गेल्या दोन अडीच वर्षात विक्री वाढली असे म्हणता येणार नाही. उलट नोटाबंदीमुळे गेल्या दोन महिन्यापासून खादीच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. आधी नागपूर केंद्रातून दर महिन्याला २० लाख रुपयांची विक्री होत होती, मात्र दोन महिन्यात यामध्ये ८ ते १० लाखाची घट झाली आहे.
- तुलाराम नेहारे, व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग, नागपूर
चरख्यावर सूतकताई आजही कठीणच
गेली अनेक वर्षे अडगळीत पडलेला गांधीजींचा चरखा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विदेशी कपड्यांची होळी करून महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला तेव्हा चरखा हे त्यांच्या आंदोलनाचे शस्त्र झाले होते. चरखा हे स्वावलंबनाचे, कष्टाचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक ठरले होते. पुढे स्वातंत्र्यानंतर हाच चरखा लाखो भारतीयांच्या रोजगाराचे साधनही झाले. पारंपरिक चरख्यानंतर न्यू मॉडेल चरखा ही मशीन आली आणि लघुउद्योगाचे स्वरूप देता येईल एवढी शक्यता निर्माण झाली. त्यामुळे एकेकाळी स्वावलंबनाचे व भारताच्या महान चळवळीचे प्रतीक असले तरी चरख्यावर सूत कातून उदरनिर्वाह करणे ही काही प्रतिमा छापण्याएवढी साधी गोष्ट नाही, अशाच काही प्रतिक्रिया खादी उद्योगात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनी व्यक्त केल्या.
खादी ग्रामोद्योग मंडळ, नागपूरचे व्यवस्थापक तुलाराम नेहारे यांनी सांगितले की, पारंपरिक चरख्याने स्वत:ला वापरता येईल एवढे सूत कातणे शक्य होते. पुढे न्यू मॉडेल चरखा आल्यानंतर थोडे अधिक काम होऊ लागले. त्यामुळे लघु उद्योगाचे स्वरूप देणे शक्य झाले. मात्र हे काम आजही कठीणच आहे. सध्या खादी ग्रामोद्योगच्या नागपूर आणि सावनेर केंद्र येथे ३० चरखा मशीन आहेत. एका चरख्यातून एका तासात १००० मीटर सुताच्या तीन गुंडी सूत कातता येते. म्हणजे दिवसभराच्या आठ तासात एक माणूस सरासरी २५ गुंडी सूत काढू शकते. प्रति गुंडी ५.५० रुपये दराने एका माणसाला १३५ रुपये रोजी पडते. त्यामध्ये १० टक्के कामगार कोष व १२ टक्के प्रोत्साहन निधी मिळतो.
दिवसाला ६०-७० रुपयचे मिळतात
खादी ग्रामोद्योग येथे काम करणाऱ्या यमुनाबाई खापेकर गेल्या ३५ वर्षापासून सूतकताई करीत आहेत. वयानुसार त्यांच्या कामाची गती कमी झाली आहे. त्यांनी सांगितले की आता दहा ते बाराच गुंडी सूत कातणे शक्य होते. प्रति गुंडी ५.३० रुपये दराने दिवसाला ६० ते ६५ रुपये पडतात. परवडत नाही मात्र अनेक वर्षापासून येथे काम करीत असल्याने सोडताही येत नाही. सोबत काम करणाऱ्या अनेकांनी काम सोडले आहे. सरकारने आमच्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक वर्षापासून काम करीत असल्याने या वयात काहीतरी मोबदला मिळावा ही अपेक्षा यमुनाबाई यांनी व्यक्त केली.