चिमुकलीचे अपहरण करणारा 'तो' नराधम विकृत वृत्तीचा! हैदराबादमध्येही केला होता गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 21:50 IST2023-06-24T21:49:56+5:302023-06-24T21:50:48+5:30
Nagpur News इतवारी रेल्वे स्थानकावरून पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करणारा नराधम श्यामकुमार पुनीतराम ध्रुव (३०) हा विकृत वृत्तीचा आहे. त्याने कलुषित मनसुब्यातूनच चिमुकलीचे अपहरण केले होते, अशी माहिती चाैकशीतून पुढे आली आहे.

चिमुकलीचे अपहरण करणारा 'तो' नराधम विकृत वृत्तीचा! हैदराबादमध्येही केला होता गुन्हा
नागपूर : इतवारी रेल्वे स्थानकावरून पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करणारा नराधम श्यामकुमार पुनीतराम ध्रुव (३०) हा विकृत वृत्तीचा आहे. त्याने कलुषित मनसुब्यातूनच चिमुकलीचे अपहरण केले होते, अशी माहिती चाैकशीतून पुढे आली आहे. यामुळे पोलिसांनाही कापरे भरले आहे. दरम्यान, यापूर्वी त्याने हैदराबादमध्येही असाच एक गुन्हा केला होता, अशीही माहिती रेल्वे पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
छत्तीसगडमधील मुंगेरी (जि. बिलासपूर) येथील रहिवासी असलेला आरोपी शामकुमार याने १७ जूनला सकाळी १० वाजता राजू दिलीप छत्रपाल (वय ३४) यांच्या पावणेतीन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले होते. तिला नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावरून उचलल्यानंतर हा नराधम बिलासपूरला पळून जाण्यासाठी थेट नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर पोहचला होता. सुदैवाने रेल्वे पोलिसांनी वेळीच धावाधाव केल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी ईतवारीच्या ठाण्यात नेऊन त्याला अटक केली. त्याची २३ जूनपर्यंत पोलीस कोठडीही मिळवण्यात आली. सात दिवसांच्या चाैकशीत आरोपी विकृत वृत्तीचा असल्याचे आणि त्याने कलुषित मनसुब्यांतूनच चिमुकलीचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून तशी कबुलीवजा माहिती मिळाल्याने काही क्षणांसाठी पोलीसही हादरले. कारण त्याला पकडण्यात यश आले नसते तर एक भयंकर गुन्हा घडला असता. त्यामुळे पोलिसांनी शामकुमार याच्याविरुद्ध अपहरणाच्या कलमासोबतच पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचे कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये गेला होता. त्याने तेथील एका महिलेच्या अंगणात जाऊन अश्लिल चाळे करून आगळीक केली होती. त्यामुळे तेथे त्याच्याविरुद्ध तसा गुन्हाही दाखल झाल्याची माहिती खुद्द आरोपीनेच दिल्याचे समजते. २३ जूनला त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एमसीआर (कारागृहात रवानगी) करण्याचे आदेश दिले.
बिलासपूरकडे दोन पथके रवाना
आरोपी लहान मुलांचे अपहरण करून त्यांना विकणाऱ्या टोळीचा सदस्य असावा, असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे तपास अधिकारी एपीआय पंजाबराव डोळे यांनी चाैकशी करण्यासाठी रेल्वे पोलिसांची दोन पथके छत्तीसगडमध्ये पाठविली होती. तेथे या पोलीस पथकांनी बिलासपूर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा क्राईम रेकॉर्ड तपासला. मात्र, तसे काही संशयास्पद पोलिसांच्या तपासात आढळले नाही. परंतू, तो विकृत वृत्तीचा असल्याचे आणि त्याला अशा गुन्ह्यांची सवय असल्याचे तपासात पुढे आले आहे.