पोटातल्या बाळाला रक्त देऊन वाचविला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:24+5:302020-12-30T04:11:24+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : दोन वेळा गर्भधारणा होऊनही विविध कारणांनी बाळ दगावल्यानंतर तिसऱ्यांदा गर्भ राहिल्याने बाळ जिवंत राहावे यासाठी ...

पोटातल्या बाळाला रक्त देऊन वाचविला जीव
सुमेध वाघमारे
नागपूर : दोन वेळा गर्भधारणा होऊनही विविध कारणांनी बाळ दगावल्यानंतर तिसऱ्यांदा गर्भ राहिल्याने बाळ जिवंत राहावे यासाठी ती माता कासावीस झाली होती. ऐपत नसतानाही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. परंतु नंतर त्यांनीही हात वर केले. शेवटचा उपाय म्हणून त्या मातेने एका परिचारिकेच्या मदतीने मेयो गाठले. येथील डॉक्टरांनी तपासल्यावर बाळाला गंभीर अॅनिमिया झाला होता. बाळाच्या पोटात पाणी झाले होते. शरीरावर सूज आली होती. हृदय आकाराने वाढले होते. ते बंद पडून मृत्यूचा धोका होता. पूर्वी अशा प्रकरणात बाळाला पोटात दगावून प्रसूती केली जात होती. परंतु मेयोतील डॉक्टरांनी आपला अनुभव व कौशल्याचा बळावर उपचाराला सुरुवात केली. पोटातील बाळाचे हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी रक्त देण्याचा निर्णय घेतला. यासाठी एका खासगी डॉक्टरला मदत मागितल्यावर त्या धावून आल्या. जोखीम पत्करून अत्यंत किचकट असलेली प्रक्रिया म्हणजे, पोटातील बाळाला रक्त दिले. तेही एकदा नव्हे दोनदा. सामूहिक प्रयत्नामुळे बाळाला जीवनदान मिळाले. दोन दिवसांपूर्वीच महिलेची प्रसूती झाली. एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाने डॉक्टरांना त्यांच्या परिश्रमाचे समाधान मिळाले.
मूळ नांदेड येथील या ३२ वर्षीय महिलेचे पहिले बाळ ९ महिन्यातच गर्भातच दगावले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा गर्भवती राहून प्रसूती झाल्यानंतर चौथ्या दिवशीच बाळाचा मृत्यू झाला. बाळाला गर्भातच अॅनिमिया झाला असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्यावर बाळ वाचावे यासाठी तिने बरेच प्रयत्न केले. परंतु तिच्या पदरी निराशा आली. शेवटचा प्रयत्न म्हणून ती मेडिकलमध्ये आली. येथील एका परिचारिकेने तिच्या समस्येला गंभीरतेने घेत मेयोतील स्त्रीरोग व प्रसूती विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अलका पाटणकर यांना एकदा दाखविण्याचा सल्ला दिला. स्वत: तिला ती घेऊनही गेली. डॉ. पाटणकर यांनी महिलेला तपासले. पोटातील बाळाला गंभीर स्वरूपातील अॅनिमिया झाल्याचे निदान केले. सामान्य भाषेत याला पंडुरोग तर वैद्यकीय भाषेत ‘हायड्रॉप सिटॅलिस’ म्हटले जाते. डॉ. पाटणकर यांनी तातडीने उपचाराला सुरुवात केली. यासाठी सिटल थेरपीचा अभ्यास केलेल्या डॉ. नीलम छाजेड या खासगी डॉक्टरची मदत मागितली. रुग्णाची गंभीर स्थिती पाहून त्यांनी मदत करण्यास पुढाकारही घेतला.
-पोटातील बाळाला रक्त देणे किचकट व धोकादायक प्रक्रिया
डॉ. पाटणकर यांनी सांगितले, पोटातील बाळाचे हिमोग्लोबीन साधारण १५ मिलिग्रम असते. परंतु या बाळाचे हिमोग्लोबीन केवळ ३.५ मिलिग्रॅम होते. यामुळे तातडीने रक्त देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा रुग्णांमध्ये साधारण वळीमधून जी नाळ निघते तिथून रक्त चढविले जाते. परंतु पोटातील बाळातील वळ ही मागच्या बाजूला होती. यामुळे बाळाच्या यकृताला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी जी नाळेतून गेली होती ती शोधून त्या द्वारे रक्तपुरवठा करण्यात आला. ही किचकट आणि अतिशय जोखमीची प्रक्रिया डॉ. छाजेड यांनी यशस्वी केली. पहिले रक्त दिल्याने बाळाचे हिमोग्लोबीन १२ मिलिग्रॅम झाले होते. धोका होऊ नये म्हणून दुसऱ्यांदा रक्त देण्यात आले.
-प्रसूतीपूर्वी ती महिला कोविड पॉझिटिव्ह
३७ आठवड्यानंतर सीझरद्वारे प्रसूती करण्याचे नियोजन करण्यात आले. ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गर्भवतीची कोरोना चाचणी करण्यात आली. यात पॉझिटिव्ह अहवाल आला. तरीही आवश्यक खबरदारी घेत प्रसूती केली. ४८ तासानंतर बाळाची कोरोना तपासणी केल्यावर बाळ निगेटिव्ह आले. उद्या बुधवारी या दोघांना रुग्णालयातून सुटी दिली जाणार असल्याची माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली.