दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी तो बनला चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:17 IST2019-06-01T00:15:44+5:302019-06-01T00:17:28+5:30
दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (२९) रा. बल्लारपूर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. घरफोडीच्या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरीची कबुली दिली आहे. चोरीचा मालही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी तो बनला चोर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (२९) रा. बल्लारपूर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. घरफोडीच्या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने चोरीची कबुली दिली आहे. चोरीचा मालही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
जरीपटका येथील अमित राजू कांबळे हे गेल्या २६ मे रोजी कुटुंबासह मावशीकडे गेले होते. दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पेट्रोलिंग करताना समतानगर येथील पानठेल्यावर एक व्यक्ती सोन्याचे मणी विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा आरोपी नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार रा. यादवनगर समता ले-आऊट हा पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याजवळ ५०० रुपये रोख आणि सोन्याचे ५ मणी आढळून आले. नीलेशची विचारपूस केली असता त्याने सांगितले की, त्याची पहिली पत्नी ही चंद्रपूरला राहते. येथे तो कामानिमित्त आला आहे. नागपुरातही त्याची दुसरी पत्नी आहे. दुसऱ्या पत्नीच्या गरजा भागवण्यासाठी तो चोरी करण्याकडे वळल्याचे सांगितले. त्याने तीन घरफोडी केल्याची कबुलीही दिली. त्याच्याजवळून ५ सोन्याचे मणी, दोन कानातले, एक सोन्याची लगडी, तीन चांदीच्या पायपट्टी, ४० हजाराची एक दुचाकी, असा एकूण ६७,९५० रुपयाचा माल जप्त केला.