नागपूर : आजपर्यंत तुम्ही अनेक रस्त्यांच्या दुरावस्था बघितल्या असतील पण नागपूरमधील एक फ्लायओव्हर NHAI कडून झालेल्या विचित्र बांधकामांच्या लिस्ट मध्ये पहिला येईल. नागपूर शहरातील अशोक चौक येथे सुरू असलेल्या इंडोरा-डिघोरी फ्लायओव्हर प्रकल्पामध्ये एक विचित्र आणि लक्ष वेधणारा प्रकार समोर आला आहे. या ९९८ कोटी रुपयांच्या प्रकल्पात तयार होत असलेली रोटरी एका घराच्या थेट बाल्कनीतून जात असल्याचं दृश्य नागरिकांना पाहायला मिळालं. यामुळे स्थानिकांमध्ये आश्चर्य आणि चिंता दोन्ही निर्माण झाल्या आहेत.
हा प्रकार इतका विचित्र आहे की, उंच रोटरीचा भाग घराच्या बाल्कनीशी एवढा जवळ पोहोचला आहे की तो थेट बाल्कनीच्या मधोमध जातोय. सोशल मीडियावर या दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेकांनी याला ‘इंजिनिअरिंगचा करिश्मा’ म्हटलं आहे, तर काहींनी ‘योजना अपयशाचं उदाहरण’ म्हणत टीका केली आहे.
बिनपरवानगीचे बांधकाम?
नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) हनुमाननगर झोनचे उप महानगर आयुक्त नरेंद्र बावनकर यांनी सांगितले की, संबंधित घरासाठी घरमालकाने कोणताही अधिकृत बांधकाम परवाना घेतलेला नाही. त्यामुळे ते अनधिकृत बांधकामाच्या श्रेणीत येते.
NHAI ने यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठवून हे घर अतिक्रमण असल्याचे सांगितले असून ते हटवण्याची मागणी केली आहे. मात्र, घरमालक आणि NHAI यांच्यात काहीतरी समजुतीने हे रोटरीचे काम बाल्कनीच्या जवळून करण्याचा निर्णय झाल्याचेही बोलले जात आहे.
मालक नुकसानभरपाईस पात्र नाही
NMC च्या म्हणण्यानुसार, घराच्या मालकाने कोणताही अधिकृत अर्ज किंवा संमतीपत्र घेतलेले नसल्यामुळे तो नुकसानभरपाईस पात्र नाही. त्यामुळे भविष्यात जर रोटरीमुळे घराला काही नुकसान झाले, तरी त्याची जबाबदारी प्रशासन घेणार नाही.
नागरिकांमध्ये गोंधळ आणि चर्चा
या विचित्र बांधकामामुळे परिसरात नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काहींना वाटतंय की हा रोड भविष्यात धोकादायक ठरू शकते. वाहतुकीचे वेग आणि घराच्या जवळून जाणारी रोटरी यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.