Hats off Nagpur Police! दंगलीचा वणवा वेळेत रोखला; हिंसाचारात अनेकांचे वाचले जीव
By योगेश पांडे | Updated: March 18, 2025 21:52 IST2025-03-18T21:51:37+5:302025-03-18T21:52:13+5:30
जिवावर उदार होऊन थांबविला संघर्ष, ‘लोकमत’ने पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन व मदतकार्य ‘ऑन द स्पॉट’ नोंद केले

Hats off Nagpur Police! दंगलीचा वणवा वेळेत रोखला; हिंसाचारात अनेकांचे वाचले जीव
योगेश पांडे
नागपूर : एकीकडे सकाळपासून कर्तव्यावर असल्याने आलेला शीण आणि दुसरीकडे पोटात अन्नाचा कणदेखील नाही अशी अडचण, तर दुसरीकडे नागपूरच्या संस्कृतीला काळिमा फासण्यासाठी सरसावलेला समाजकंटकांचा जमाव. स्वत:च्या अडचणींपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व देत चिटणीस पार्क, भालदारपुरा, हंसापुरी या भागात सोमवारी रात्री पोलिसांनी जीव धोक्यात टाकून धाव घेतली व जमावाच्या दगडफेकीला स्वत: सामोरे गेले. महालात संघर्ष पेटला हे वास्तव असले, तरी दंगलीचा वणवा रौद्र रूप घेऊन कुणाच्या जिवावर उठण्याअगोदर पोलिसांनी त्याला रोखले. जिवावर उदार होऊन पोलिसांनी संघर्ष थांबविला व त्यामुळे मंगळवारी दिवसभर संवेदनशील भागात शांतता दिसून आली. पोलिसांच्या भूमिकेबाबत राजकीय मतमतांतरे असली, तरी नागरिकांमध्ये मात्र हॅट्स ऑफ टू नागपूर पोलिस असाच सूर दिसून येत आहे.
‘लोकमत’ने पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन व मदतकार्य ‘ऑन द स्पॉट’ नोंद केले. रात्री साडेआठ वाजता शिवाजी पुतळा चौक व चिटणीस पार्क चौकात आगडोंब उसळल्यानंतर शहरातील सर्वच झोनमधील अधिकारी, कर्मचारी पोहोचले. पोलिसांसमोरील सर्वात मोठे आव्हान समाजकंटकांना थांबवून इतर जमावाला शांत करण्याचे होते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी यांच्यासह सर्वच उपायुक्त, सहायक आयुक्तांनी यात पुढाकार घेतला. अक्षरश: समाजकंटकांच्या दगडफेकीलादेखील ते सामोरे गेले.
जीव संकटात टाकत राबविले कोम्बिंग ऑपरेशन
रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी भालदारपुऱ्यात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली. अनेक समाजकंटक लहान गल्ल्यांमध्ये लपले होते व त्यांचे साथीदार वरील मजल्यांवर बसले होते. पोलिस समाजकंटकांचा शोध घेत पोहोचताच वरील मजल्यांवर मोठमोठे दगड, टाइल्सचे तुकडे फेकण्यात येत होते. यात महिला, पुरुष पोलिस कर्मचारी जखमीदेखील झाले. लोकमत प्रतिनिधीच्या डोळ्यासमोर एका पोलिस अधिकाऱ्याच्या तोंडावर दगडाचा प्रहार झाला. मात्र, वेळ आल्यावर पोलिसांनी चक्क वाहन चालविण्याचे हेल्मेट डोक्यात घालत कोम्बिंग ऑपरेशन राबविले व ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी सातपासून कर्तव्यावर असणारे काही अधिकारी-कर्मचारी तर मंगळवारीदेखील निरंतर ड्युटीवर दिसून आले.
भालदारपुऱ्यातील लोण पोहोचले हंसापुरीत
पोलिसांचे रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास भालदारपुरा व आजूबाजूच्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. पोलिस आयुक्त स्वत: त्याचे नेतृत्व करत होते. त्यावेळी हंसापुरीत समाजकंटकांच्या जमावाने काही घरांवर हल्ला केला. पोलिसांपर्यंत याची माहिती पोहोचली, मात्र बहुतांश अधिकारी-कर्मचारी संवेदनशील भागातच असल्याने तिथपर्यंत पोहोचायला उशीर झाला. तोपर्यंत हंसापुरीत दुचाकी, चारचाकी वाहने जाळण्यात आली होती. मात्र, पोलिस वेळेत पोहोचल्याने उग्र जमावाला पांगविण्यात यश आले. अन्यथा तेथे घरे जाळण्याची तयारी करूनच समाजकंटक पोहोचले होते.
तीन नव्हे चार उपायुक्त जखमी
पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार झाल्याने ते जखमी झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्यासोबतच उपायुक्त अर्चित चांडक यांच्या लिगामेंटला दुखापत झाली, तर उपायुक्त शशिकांत सावत यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती पहाटे पोलिस आयुक्तांनी दिली. याशिवाय झोन दोनचे उपायुक्त राहुल मदने यांच्या तोंडावरदेखील जमावातील एकाने दगडाने प्रहार केला व त्यात त्यांना चांगलाच मुका मार बसला.